पेरूच्या वारी संस्कृतीने ‘भ्रम निर्माण करणार्‍या पेया’ने विस्तारला प्रदेश? 
विश्वसंचार

पेरूच्या वारी संस्कृतीने ‘भ्रम निर्माण करणार्‍या पेया’ने विस्तारला प्रदेश?

नव्या अभ्यासात दावा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्कः पेरू, चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांवर राज्य करणार्‍या वारी संस्कृतीने आपल्या राजकीय सत्तेचा विस्तार करण्यासाठी ‘भ्रम निर्माण करणार्‍या बिअर’चा (hallucinogenic beer) वापर केला असावा, असा एक नवीन सिद्धांत मांडला गेला आहे. मध्य अँडीज पर्वतरांगेत (central Andes Mountains) 600 ते 1000 AD या काळात ही संस्कृती भरभराटीस आली होती.

वारी संस्कृती त्यांच्या दफनविधी, मानवी बळी आणि सोने, चांदी व कांस्य धातूंमधून बनवलेल्या उत्कृष्ट कलाकुसरीच्या वस्तू यासाठी ओळखली जाते. त्यांनी मंदिरे आणि उच्चभू्र निवासस्थानांसह शहरे बांधली होती आणि पेरूचा मोठा भाग तसेच चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांवर त्यांचे नियंत्रण होते. 6 ऑक्टोबर 2025 रोजी ‘रेव्हिस्टा दे आर्कियोलॉजिया अमेरिकाना’ या पुरातत्त्वशास्त्रावरील शैक्षणिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात हा महत्त्वपूर्ण दावा करण्यात आला आहे.

कॅनडातील रॉयल ओंटारियो म्युझियमचे क्युरेटर जस्टिन जेनिंग्स आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वारीच्या पुरातत्त्व स्थळांवर ‘अनाडेनान्थेरा कोलुब्रिना’ नावाच्या भ्रम निर्माण करणार्‍या वनस्पतीचे अवशेष शोधले आहेत. या वनस्पतीला ‘विल्का’ म्हणूनही ओळखले जाते. संशोधकांनी सांगितले की, विल्काचे बियाणे मिरीच्या दाण्यांपासून बनवलेल्या बिअरच्या अवशेषांजवळ सापडले आहेत. यावरून बिअरमध्ये ‘विल्का’ मिसळली जात असावी, असा कयास लावण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, विल्कामुळे तीव्र नशा येत नसली, तरी तिचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. अशा प्रकारच्या भ्रम निर्माण करणार्‍या पदार्थांच्या अभ्यासातून दिसून आले आहे की, ते घेणार्‍या व्यक्तींमध्ये ‘अधिक मोकळेपणा आणि सहानुभूती’ दिसून येते.

वारी वस्तींना भेट देणारे लोक त्यांच्या अंगणांमध्ये आयोजित केलेल्या मेजवानीत सहभागी होत असत. जिथे ते अनेक तास वारी लोकांशी भ्रम निर्माण करणारी बिअर पीत, जेवण करीत, बोलत आणि प्रार्थना करत असत. संशोधकांचा विश्वास आहे की, या अनुभवांमुळे वारी आणि इतर समुदायांमध्ये मजबूत बंध निर्माण झाले, ज्यामुळे वारीची राजकीय सत्ता मजबूत होण्यास मदत झाली. संशोधकांनी त्यांच्या पेपरमध्ये लिहिले आहे की, ‘वर्षातून अनेक वेळा विल्का बिअर पिण्याचे दीर्घकालीन मानसिक परिणाम सहभागींमध्ये नवीन संज्ञानात्मक नियम आणि अधिक मोकळेपणा तसेच सहानुभूती निर्माण करू शकतात. ही वैशिष्ट्ये वारी राज्यासाठी अत्यंत अनुकूल होती, कारण त्यांचे सामर्थ्य एकेकाळी अनोळखी किंवा शत्रू असलेल्या लोकांशी मैत्रीपूर्ण, दैनंदिन समोरासमोरच्या संवादावर अवलंबून होते. संशोधकांनी ‘भ्रम निर्माण करणार्‍या बिअर’ने वारीच्या वर्चस्वात (dominance) महत्त्वाची भूमिका बजावली असा निष्कर्ष काढला असला, तरी या अभ्यासात सामील नसलेल्या संशोधकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT