Peru Indigenous People | बटाटे पचवण्यात पेरूचे मूळ रहिवासी जगात अव्वल  hadynyah
विश्वसंचार

Peru Indigenous People | बटाटे पचवण्यात पेरूचे मूळ रहिवासी जगात अव्वल

शरीरात झाले उत्क्रांतीजन्य बदल

पुढारी वृत्तसेवा

लिमा : पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांमध्ये राहणारे मूळ रहिवासी जगातील इतर कोणत्याही लोकांपेक्षा बटाटे आणि इतर पिष्टमय पदार्थ अधिक सहजपणे पचवू शकतात, असा एक रंजक खुलासा नुकत्याच झालेल्या संशोधनातून झाला आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यात ‘नॅचरल सिलेक्शन’ (नैसर्गिक निवड) च्या प्रक्रियेमुळे त्यांच्या शरीरात हा विशेष बदल झाला आहे.

‘नेचर कम्‍युनिकेशन्‍स’ या जर्नलमध्ये ५ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अँडीजच्या मूळ रहिवाशांमध्ये लाळेमध्ये असणाऱ्या ‘अमायलेज’ या पिष्टमय पदार्थ पचवणाऱ्या एन्झाईमच्या (विकर) जनुकांची संख्या जगातील इतर कोणत्याही लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सुमारे १०,००० वर्षांपूर्वी या भागात बटाट्याची शेती सुरू झाल्यानंतर, या लोकांमध्ये अमायलेज जनुकांची संख्या वाढण्यास ‘नॅचरल सिलेक्शन’ कारणीभूत ठरले. मानवी लाळेतील अमायलेज हे गुंतागुंतीचे पिष्टमय पदार्थ साध्या साखरेमध्ये विघटित करते, ज्यामुळे ते पचायला सोपे जाते.

जगभरातील लोकांमध्ये या अमायलेज जनुकांच्या प्रतींची संख्या वेगवेगळी असते. जितक्या जास्त प्रती, तितके अमायलेजचे उत्पादन जास्त होते आणि पिष्टमय पदार्थांचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. जागतिकस्तरावर पाहिल्यास, सर्वसामान्य लोकांमध्ये अमायलेज जनुकांच्या सरासरी ७ प्रती असतात; परंतु पेरूच्या अँडियन मूळ रहिवाशांमध्ये ही सरासरी तब्बल १० प्रती इतकी आहे. संशोधकांनी अभ्यासात नमूद केले आहे की, ज्या लोकांमध्ये या जनुकांची संख्या जास्त होती, त्यांच्यात कमी जनुके असलेल्यांच्या तुलनेत जगण्याची आणि वंश पुढे वाढवण्याची शक्यता १.२४ टक्के जास्त होती.

१.२४ टक्के ही टक्केवारी पाहताना लहान वाटत असली, तरी उत्क्रांतीच्या दृष्टीने हा अत्यंत मोठा आणि अद्‌भुत अनुकूल फायदा आहे. हा फायदा प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये अधिक मजबूत होत गेला, अशी माहिती या अभ्यासाचे सह-लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोचे जैविक विज्ञानाचे प्राध्यापक ओमर गोककुमेन यांनी दिली. या संशोधनामुळे मानवाने आपल्या आहारातील बदलानुसार स्वतःमध्ये जनुकीय पातळीवर कशा प्रकारे बदल घडवून आणले, यावर एक नवा प्रकाश पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT