moon base human settlement | चंद्रावर साकारणार मानवाचे कायमस्वरूपी घर! 
विश्वसंचार

moon base human settlement | चंद्रावर साकारणार मानवाचे कायमस्वरूपी घर!

‘नासा’चा आर्टेमिस मोहिमेद्वारे मोठा प्लॅन; अणुऊर्जेवर चालणार्‍या मून बेसचे काम लवकरच सुरू!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आर्टेमिस-2 मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर आता अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या दिशेने आक्रमक पावले उचलली आहेत. 2030 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक कायमस्वरूपी मून बेस (लुनार आऊट पोस्ट) उभारण्याची ‘नासा’ची योजना असून, हे केंद्र सौरऊर्जेवर नाही, तर चक्क अणूऊर्जेवर (न्युक्लियर पॉवर) चालणार आहे.

2028 पासून बांधकामाला सुरुवात?

‘नासा’चे प्रशासक जॅरेड आयझॅकमन यांनी जाहीर केल्यानुसार, आर्टेमिस-3 मोहीम 2027 मध्ये चंद्राच्या कक्षेत चाचण्या करेल, तर 2028 च्या अखेरीस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रत्यक्ष तळाचे बांधकाम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेमुळे चंद्र आता केवळ पाहण्यापुरता मर्यादित न राहता, मानवाचे दुसरे घर बनणार आहे.

चंद्राचा दक्षिण ध्रुवच का निवडला?

चंद्राचा दक्षिण ध्रुव हा अत्यंत खडतर भाग आहे. तिथे तापमान शून्याखाली शेकडो अंश असते आणि सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. तरीही ‘नासा’ने याच भागाची निवड केली आहे. कारण, येथील विवरांमध्ये अब्जावधी वर्षांपासून गोठलेल्या स्वरूपात पाणी (बर्फ) असण्याची शक्यता आहे. या बर्फापासून पिण्याचे पाणी, श्वसनासाठी ऑक्सिजन आणि रॉकेटसाठी हायड्रोजन इंधन तयार करता येईल. यामुळे चंद्रावरील तळ पृथ्वीवर अवलंबून न राहता स्वावलंबी होईल.

तीन टप्प्यात होणार विकास

1. प्रायोगिक टप्पा : यामध्ये मानवरहित मोहिमांद्वारे ऊर्जा निर्मिती आणि दळणवळण यंत्रणांची चाचणी केली जाईल.

2. पायाभरणी : दुसर्‍या टप्प्यात अंतराळवीरांच्या मदतीने निवासासाठी प्राथमिक पायाभूत सुविधा (हवेने फुगवता येणारे निवारे) तयार केल्या जातील.

3. कायमस्वरूपी तळ : तिसर्‍या टप्प्यात जशी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर कायमस्वरूपी टीम असते, तशीच व्यवस्था चंद्रावर केली जाईल. अंतराळवीर तिथे काही महिन्यांसाठी मुक्काम करू शकतील.

अणूऊर्जेचा वापर अनिवार्य

चंद्रावर रात्र 14 दिवसांची असते, ज्या काळात सूर्यप्रकाश नसतो. अशा वेळी सौरऊर्जा कुचकामी ठरते. म्हणूनच ‘नासा’ तिथे न्यूक्लियर फिशन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. एक लहान अणूभट्टी या तळाला सलग दोन दशके वीज पुरवू शकते.

हायटेक रोव्हर्स आणि उपग्रह

या तळाच्या देखभालीसाठी आणि संशोधनासाठी ‘नासा’ ल्युनार टेरेन व्हेईकल्स (एलटीव्ही) वापरणार आहे. हे रोव्हर्स अंतराळवीर स्वतः चालवू शकतील किंवा पृथ्वीवरून रिमोटद्वारे नियंत्रित केले जातील. तसेच, चंद्राभोवती स्वतःची स्वतंत्र जीपीएस आणि दूरसंचार उपग्रह प्रणाली (उदा. युरोपचा मूनलाईट प्रोजेक्ट) तैनात केली जाणार आहे.

मंगळ मोहिमेसाठी प्रवेशद्वार

‘हा केवळ चंद्रावर ध्वज फडकवण्याचा प्रयत्न नाही, तर भविष्यातील मंगळ (मार्स) मोहिमेसाठीची ही पूर्वतयारी आहे,’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याने तिथून रॉकेट प्रक्षेपित करणे पृथ्वीच्या तुलनेत खूप स्वस्त पडणार आहे. अंतराळवीर क्रिस्टिना कोच म्हणतात, ‘आम्ही चंद्रावर पुन्हा जाणार आहोत, तिथे सायन्स पोस्ट उभारू, रोव्हर्स चालवू आणि नवनवीन उद्योग सुरू करू. हे सर्व मानवजातीच्या पुढच्या मोठ्या प्रवासासाठी असेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT