विश्वसंचार

Peregrine Falcon : रॉकेटच्या वेगाने शिकार करणारा पक्षी

Arun Patil

न्यूयॉर्क : पक्षी हे विमानाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत उडू शकतात. विविध प्रकारचे पक्षी त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे ओळखले जातात. मात्र, पेरेग्रिन फाल्कन (Peregrine Falcon) हा जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे. या पक्षाचा उडण्याचा वेग हा स्पोर्टस् बाईकच नाही तर स्पोर्टस् कारपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे हा पक्षी शिकारही तितक्याच सुपरस्पीडने करतो. हा पक्षी रॉकेटच्या स्पीडने आपल्या सावजावर हल्ला करतो. या पक्षाचा शिकार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पेरेग्रीन फाल्कन्स (Peregrine Falcon) हा बहिरी ससाणा अंटार्टिका वगळता सर्व खंडांमध्ये आढळतो. कावळ्याच्या आकाराच्या या पक्ष्याच्या वेगासमोर स्पोर्टस् बाईकच नाही तर स्पोर्टस् कारही फेल ठरतील. या पक्ष्याचा सरासरी वेग हा 320 कि.मी. प्रति तास इतका असतो. या पक्ष्याचा जास्तीत जास्त वेग हा ताशी 390 किलोमीटर इतका नोंदवण्यात आला आहे. जेव्हा हा पक्षी सरळ रेषेत उडतो तेव्हा त्याचा सामान्य वेग 40 ते 55 किलोमीटर प्रतितास असतो. शिकार शोधताना हा पक्षी 112 कि.मी. प्रतितास वेगाने उडतो. पेरेग्रिन फाल्कन आकाराने कावळ्या इतकाच आहे. या पक्षाच्या शरीराचा पुढचा भाग पांढरा असतो, तर मागचा भाग निळा आणि राखाडी असतो.

याचे डोके काळ्या रंगाचे असते. काही ठिकाणी स्थानिक भाषेत या पक्षाला 'डक हॉक' असेही म्हणतात. या पक्षाचा सर्वसामान्य आकार हा 13 ते 23 इंच इतका लांब असतो. जेव्हा हा पक्षी पंख पसरतो तेव्हा त्याचे पंखांचा विस्तार 29 ते 47 इंचापर्यंत असतो. मादी पेरेग्रीन फाल्कन नरापेक्षा आकाराने मोठा असतो. मादीच्या शरीराचा आकार पुरुषापेक्षा 30 टक्के मोठा असतो. नर पेरेग्रीनचे वजन एक किलोग्रॅम असते. तर मादीचे वजन जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असते. पेरेग्रिन फाल्कन हे पक्षी हवेत उडत असतानाच शिकार करतात. या पक्षाच्या 17 ते 19 प्रजाती अस्तित्वात आहेत.

SCROLL FOR NEXT