Pentagon UFO Secrets | पेंटागॉन, सीआयएची ७० वर्षांतील 'यूएफओ' गुपिते  
विश्वसंचार

Pentagon UFO Secrets | पेंटागॉन, सीआयएची ७० वर्षांतील 'यूएफओ' गुपिते

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागॉन) आणि गुप्तचर संस्थेने (सीआयए) दशकांपासून गुप्त ठेवलेल्या 'यूएफओ' (अज्ञात उडत्या वस्तू) तपासाची कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक केली आहेत. २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या या संग्रहात ४० महत्त्वाचे दस्तऐवज, तीन नवे लष्करी व्हिडीओ आणि संरक्षण कंत्राटदार 'बिगलो एरोस्पेस'च्या २.२ कोटी डॉलर्सच्या कार्यक्रमाचा ४९४ पानी अहवाल समाविष्ट आहे. १९५२ ते २०२६ या ७० वर्षांहून अधिक काळातील गूढ घटनांचा उलगडा यातून झाला आहे.

या कागदपत्रांमध्ये २०२०, २०२३ आणि २०२६ दरम्यान मध्यपूर्वेत टिपलेले तीन नवे व्हिडीओ आहेत. नाईट-व्हिजन आणि हीट-सीकिंग कॅमेऱ्यांद्वारे टिपलेल्या या फुटेजमध्ये आकाशात वेगाने हालचाल करणाऱ्या अज्ञात वस्तू दिसत आहेत. याशिवाय, २०२३ मध्ये पश्चिम अमेरिकेच्या आकाशात नागरी रडारवर ताशी सुमारे १,६५० मैल (मॅक २.५) वेगाने प्रवास करणाऱ्या एका गूढ वस्तूची नोंद झाली होती. ५५,००० ते ७०,००० फूट उंचीवर या वस्तूने अवघ्या ८४ सेकंदांत ३८.५ मैल अंतर पार केले होते, ज्याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

अण्वस्त्र तळांवर घिरट्या

शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिकेच्या अण्वस्त्र तळांजवळ अज्ञात वस्तू दिसल्याच्या नोंदी यात आहेत. मार्च १९६७ मध्ये मोंटाना येथील माल्मस्ट्रॉम हवाई तळावर एक चमकणारी तबकडी दिसली असताना तेथील १० अण्वस्त्र क्षेपणास्त्रे अचानक निकामी झाली होती. तसेच, १९५२ मध्ये सीआयएने १,५०० 'फ्लाइंग सॉसर'च्या घटनांची नोंद घेतली होती, ज्यात १० ते २० टक्के घटनांचे कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकले नव्हते.

स्किनवॉकर रँच आणि गूढ संशोधनाचे आराखडे

अहवालानुसार, २००९ मध्ये पेंटागॉनच्या विशेष पथकाने उटाह येथील कुप्रसिद्ध 'स्किनवॉकर रँच' येथे तपास केला, जिथे त्यांना तापमानात अचानक घट आणि गूढ प्रकाश दिसल्याचा अनुभव आला. याच काळात, सापडलेले अज्ञात अवशेष आणि जैविक नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी नेवाडा वाळवंटाखाली ३ फूट जाड भिंतींची ५,००० चौरस फुटांची गुप्त तिजोरी बांधण्याचा आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र, ती प्रत्यक्षात बांधली गेल्याचा कोणताही पुरावा या कागदपत्रांत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT