नवी दिल्ली : आपल्या मेंदूमध्ये वाटाण्याच्या दाण्याइतकी एक अत्यंत छोटी ग्रंथी असते, जिला ‘पिनिअल ग्लँड’ म्हणतात. आकाराने लहान असूनही, ही ग्रंथी आपले शरीर आणि मन या दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची प्रचंड ताकद बाळगते. पिनिअल ग्रंथीचे मुख्य काम ‘मेलाटोनिन’ नावाचे संप्रेरक (हार्मोन) तयार करणे हे आहे. हे संप्रेरक आपल्या शरीराचे ‘स्लीप सायकल’ म्हणजेच झोपण्याची आणि जागण्याची घड्याळ नियंत्रित करते.
रात्रीच्या वेळी ही ग्रंथी जास्त मेलाटोनिन तयार करते, ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. दिवसा मेलाटोनिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शरीर सतर्क आणि सक्रिय राहते. थकवा, झोप न येणे किंवा वारंवार मूड बदलणे यांसारख्या समस्यांच्या मुळाशी या ग्रंथीची निष्क्रियता असू शकते. ही ग्रंथी केवळ झोपच नाही, तर शरीरातील इतर अनेक प्रक्रियांवरही परिणाम करते.
हार्मोनल संतुलन : ही ग्रंथी पिट्यूटरी आणि हायपोथॅलेमस ग्रंथींना प्रभावित करून संपूर्ण शरीरातील संप्रेरकांचे संतुलन राखते.
अँटी-ऑक्सिडंट : मेलाटोनिन एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते, जे पेशींचे संरक्षण करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया संथ करण्यास मदत करते.
मुलांमध्ये सक्रियता : लहान मुलांमध्ये ही ग्रंथी सर्वाधिक सक्रिय असते; परंतु वाढत्या वयानुसार तिची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. ही छोटी ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही साधे उपाय तज्ज्ञांनी सुचवले आहेत.
1. कोवळी धूप : दररोज सकाळी 5-10 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.
2. योग आणि ध्यान : ध्यान आणि प्राणायाम केल्याने लाभ मिळतो.
3. आहार : हळद आणि मिरी घातलेले दूध पिणे फायदेशीर ठरते.
4. ब्लू लाईटपासून दूर राहा : झोपण्यापूर्वी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर टाळा, कारण त्यातील निळा प्रकाश मेलाटोनिन निर्मितीत अडथळा आणतो.
5. फ्लोराईड टाळा : शुद्ध पाण्याचे सेवन करा आणि फ्लोराईडयुक्त पदार्थांचा संपर्क कमी करा.