विश्वसंचार

अमेरिकेत रुग्णांवर होतोय हॉस्पिटलप्रमाणेच घरच्या घरी इलाज

Arun Patil

वॉशिंग्टन : पोर्टलँडमध्ये राहणार्‍या 44 वर्षीय रुडी वॉटजिग या व्यक्तीला लिव्हरशी संबंधित विकारामुळे अतिदक्षता विभागात दाखल व्हावे लागले. वास्तविक, वॉटजिगला हॉस्पिटलचे वातावरण अजिबात सहन होत नाही. याशिवाय, त्याला कुटुंबापासून दूर रहायचे नव्हते. नेहमी हाताशी लागणार्‍या वस्तू त्याला उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. पण, याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता वॉटजिगसारखे असे अनेक लोक असतात, ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याचा तिटकारा असतो. आता मात्र यावर अमेरिकेत मार्ग काढण्यात आला असून तेथे 'हॉस्पिटल अ‍ॅट होम' हा नवा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अमेरिकेतील 4 राज्यात या उपक्रमाला सुरुवात केली गेली आहे.

वॉटजिगसारखे अनेक लोक, अनेक रुग्ण असेही असतात, ज्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हायचे, या फक्त विचारानेच पोटात गोळा येतो. त्यानंतर तिथे गेल्यावर काय, हा प्रश्नच. पण, याचवेळी तब्येतीची हेळसांडही होता कामा नये, हेदेखील तितकेच महत्त्वाचे. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमानुसार, अमेरिकेत घरीच रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. घरीच उपचार घेऊ इच्छिणार्‍या रुग्णांसाठी सर्व वैद्यकीय उपकरणे, मॉनिटर्स व व्हर्च्युअल केअर टीम तैनात केली जाते. याशिवाय, व्हिडीओ व्हिजिटसाठी स्वतंत्र मॉनिटर उपलब्ध केले जाते. केवळ एक बटण दाबून दिवसातून केव्हाही या सोयीचा लाभ घेता येऊ शकतो. फोन कॉल आल्यानंतर वियरेबल सातत्याने वायटल्स चेक करते. याशिवाय बीपी मॉनिटर कफ, पल्स ऑक्सिमीटर व अ‍ॅलर्ट नेकसेटही कार्यान्वित होते. काही समस्या असल्यास हा नेकसेट डॉक्टरांना अ‍ॅलर्ट पाठवतो. रोज डॉक्टरांकडून दोन वेळा व्हिडीओ व्हिजिट होते किंवा आवश्यकतेनुसार डॉक्टर थेट घरी भेट देतात.

एट्रियम हेल्थ केअरचे प्रमुख कोलिन होल याबाबत अधिक बोलताना सांगतात, ही केवळ घरगुती स्वास्थ्य योजना नाही तर हॉस्पिटलमधील सर्व सुविधा घरीच उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. सध्या या उपक्रमांतर्गत अशाच रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट न करून घेता घरच्या घरीच उपचार देणे शक्य होईल. पण, भविष्यात ज्यांना हॉस्पिटलमध्ये न येता आपल्या घरच्या घरीच आपल्या आवडत्या सोफ्यावर, खुर्चीवर बसून उपचार घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी हा उपक्रम अर्थातच क्रांतिकारी ठरणार आहे.

चीफ फिजिशियन डॉ. विवियन रेसेस यांनी 'घरच्या घरी उपचार घेणारे रुग्ण आजारातून लवकर बरे होतात', असा आपला निष्कर्ष असल्याचे याप्रसंगी म्हणाले. 'हॉस्पिटलच्या वातावरणाचा अनेकांना तिटकारा असतो. पण, यात काहीही पर्याय नव्हता. आता मात्र यात बदल झाला आहे. आता रुग्ण उपचार घेत असतात आणि त्याचवेळी आपल्या कुटुंबासह वेळ व्यतित करत असतात. ते घरच्या घरी राहून टीव्ही पाहत उपचार घेऊ शकतात. घरच्या वातावरणातच राहिल्याने आजारातून लवकर बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे', याचा रेसेस यांनी येथे उल्लेख केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT