जगातील पहिल्या छायाचित्रातील ‘त्या’ दोन व्यक्तींचे रहस्य १८८ वर्षांनंतर उलगडले  
विश्वसंचार

जगातील पहिल्या छायाचित्रातील ‘त्या’ दोन व्यक्तींचे रहस्य १८८ वर्षांनंतर उलगडले

पॅरिस प्रशासनाकडून त्या ठिकाणी कांस्य स्मृतिफलक उभारणी

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : जगातील सुरुवातीच्या छायाचित्रांपैकी एका छायाचित्रात दिसणारे दोन पुरुष नेमके कुठे उभे होते, याचे रहस्य अखेर उलगडले आहे. पॅरिसमधील तीन चित्रपट निर्मात्यांनी शहराच्या जुन्या नकाशांचा, संग्रहालयांतील दस्तऐवजांचा आणि त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिकृतींचा अभ्यास करून सुमारे १८८ वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक ठिकाणाचा शोध लावला. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्यासाठी पॅरिस प्रशासनाने तेथे कांस्य स्मृतिफलकही उभारला आहे.

बूट पॉलिश करताना टिपले गेले दोन पुरुष

१८३८ मधील वसंत ऋतूतील एका सकाळी पॅरिसच्या बुलेवार द्यु तांपल या रस्त्यावर एक व्यक्ती बूट पॉलिश करून घेण्यासाठी थांबली होती. छायाचित्रकार लुई दागेर यांनी आपल्या स्टुडिओतून टिपलेल्या छायाचित्रात बूट पॉलिश करणारा कारागीर आणि त्याचा ग्राहक दिसतात. छायाचित्रात मानवी आकृती टिपली गेल्याची ही सर्वात पहिल्या नोंदींपैकी एक मानली जाते. दागेर यांनी विकसित केलेल्या ‘दागेरोटाईप’ या छायाचित्रण प्रक्रियेत प्रतिमा टिपण्यासाठी बराच वेळ लागत असे. काही वेळा दहा मिनिटांपर्यंत उघडे ठेवावे लागणारे कॅमेऱ्याचे भिंग हे त्या काळातील तंत्राचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर व्यक्ती हालचालींमुळे छायाचित्रात स्पष्ट दिसल्या नाहीत. मात्र, बूट पॉलिश करून घेणारा ग्राहक आणि कारागीर काही काळ एकाच जागी थांबल्याने त्यांच्या आकृती छायाचित्रात उमटल्या.

दोन वर्षांच्या संशोधनानंतर ठिकाण निश्चित

चित्रपट निर्माते मॅक्सिमिलियन व्हान एर्ट्रिक, ॲक्सेल डॅनियलसन आणि कॅले बोमन यांनी २०२४ मध्ये या शोधाला सुरुवात केली. पॅरिसमधील प्लास द ला रिपब्लिक परिसरात फिरताना त्यांना या छायाचित्रातील व्यक्ती नेमक्या कुठे उभ्या होत्या, हे शोधण्याची कल्पना सुचली. मात्र, गेल्या दोन शतकांत शहराच्या रचनेत मोठे बदल झाले होते. दागेर यांचा स्टुडिओ आणि जवळचे डायोरामा थिएटर १८३९ मध्ये आगीत नष्ट झाले. त्यानंतर पॅरिसच्या पुनर्रचनेत अनेक जुन्या इमारती पाडण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी शहर आणि संग्रहालयांतील अभिलेख तपासले. त्या काळातील तीन इमारती अद्याप अस्तित्वात असल्याचे त्यांना आढळले. या इमारतींच्या आधारे परिसराची त्रिमितीय प्रतिकृती तयार करण्यात आली. दोन वास्तुविशारद संस्थांच्या मदतीने छायाचित्रातील बूट पॉलिश करण्याच्या जागेचे स्थान निश्चित करण्यात आले. दोन्ही संस्थांनी काही फुटांच्या अंतरावर असलेली वेगवेगळी ठिकाणे सुचवली. अखेरीस या दोन्ही अंदाजांमधील जागा निश्चित करण्यात आली.

ऐतिहासिक क्षणाला कांस्यफलकातून उजाळा

१५ ऑक्टोबर रोजी पॅरिस प्रशासनाने या ठिकाणी कांस्य स्मृतिफलक बसवला. त्याला फ्रेंच भाषेत ‘अन देताय इम्प्रेव्ह्यू’ म्हणजेच ‘एक अनपेक्षित तपशील’ असे नाव देण्यात आले आहे. छायाचित्रात योगायोगाने टिपल्या गेलेल्या दोन व्यक्तींच्या आकृतींचा हा संदर्भ आहे. या शोधाचे महत्त्व केवळ दोन व्यक्तींचे स्थान निश्चित करण्यापुरते मर्यादित नाही. हे छायाचित्र सामाजिक संवाद आणि श्रम टिपणाऱ्या सुरुवातीच्या छायाचित्रांपैकी एक असल्याचे चित्रपट निर्माते व्हान एर्ट्रिक यांनी म्हटले आहे. छायाचित्रणाच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण क्षणाची आठवण आता पॅरिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना प्रत्यक्ष जागेवर अनुभवता येणार आहे. सुमारे दोन शतकांपूर्वीच्या तंत्रज्ञानाने जगाला प्रतिमा टिपण्याचा नवा मार्ग दिला; आज त्याच प्रतिमेने आधुनिक शहराच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा धागा पुन्हा जोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT