लाहोर : 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर प्रथमच पाकिस्तानच्या एका मोठ्या विद्यापीठात संस्कृत भाषेचे वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू आहे. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ( LUMS) च्या गुरमानी सेंटरमध्ये संस्कृत शिकवण्याची पूर्ण तयारी सुरू आहे. अनेक विद्वानांचे म्हणणे आहे की, हे पाऊल भारत आणि पाकिस्तानचा सांस्कृतिक इतिहास जोडणारा सिद्ध होऊ शकते.
या पुढाकारामुळे आगामी काळात पाकिस्तानातच शिकलेले संस्कृत जाणकार आणि गीता-महाभारताचे विशेषज्ञ पाहायला मिळणार आहेत. या घोषणेमुळे विद्यार्थी, संशोधन अभ्यासक आणि दक्षिण आशियाई इतिहास समजून घेऊ इच्छिणार्यांमध्ये खूप उत्साह आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात अनेकदा तणावाच्या बातम्या येत असल्या, तरी याच दरम्यान पाकिस्तानकडून एक अत्यंत सकारात्मक पुढाकार समोर आला आहे. गुरमानी सेंटरचे संचालक डॉ. अली उस्मान कासमी यांचे म्हणणे आहे की, हे पाऊल नवीन संधी उघडेल आणि येत्या 10-15 वर्षांत पाकिस्तानात जन्मलेले विद्वान संस्कृत, गीता आणि महाभारतावर सखोल संशोधन करताना दिसतील.
संस्कृत ही जगातील सर्वात जुन्या आणि समृद्ध भाषांपैकी एक मानली जाते. 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानात ती कधीही औपचारिकपणे शिक्षणाचा भाग नव्हती. आता अनेक दशकांनंतर LUMS मध्ये तिचे पुनरागमन होताना दिसत आहे. याला दक्षिण आशियाच्या सामायिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरांना पुन्हा जोडण्याचे संकेत मानले जात आहेत. संस्कृत भाषेचे संशोधक डॉ. शाहिद रशीद या पुढाकारावर खूश आहेत. त्यांनी स्वतः अनेक वर्षे या भाषेचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, LUMS मधील संस्कृतची सुरुवात छोटी असली, तरी ती खूप महत्त्वाची आहे.
कारण, ही त्या भाषेला पुन्हा समोर आणत आहे, जिने शतकानुशतके संपूर्ण प्रदेशाच्या साहित्यिक, दार्शनिक आणि आध्यात्मिक विचारांना आकार दिला आहे. गुरमानी सेंटरनुसार, संस्कृत कोर्ससाठी विद्यार्थी आणि संशोधकांकडून मोठी आवड व उत्सुकता दर्शवली जात आहे. दक्षिण आशियाचा इतिहास, धर्म, संस्कृती आणि विचार समजून घेण्यासाठी तरुण पुन्हा प्राचीन भाषांकडे वळत आहेत. सेंटर लवकरच या दिशेने आणखी उपक्रम राबवण्याची योजना करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या भाषेशी जोडले जाऊ शकेल.