मॉन्ट्रियल (कॅनडा) : ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) प्रक्रियेतून जाणार्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयव्हीएफ उपचारादरम्यान स्त्री बिजे संकलित करण्यापूर्वी अनेक आठवडे दररोज हार्मोनल इंजेक्शन्स घ्यावी लागतात. आता संशोधकांनी या वेदनादायक सुयांना पर्याय म्हणून एक ‘लाईट-अॅक्टिव्हेटेड मायक्रोनीडल पॅच’ विकसित केला आहे, जो स्वयंचलितपणे शरीरात औषध सोडू शकतो.
मॅकगिल विद्यापीठ आणि क्यूबेक येथील खछठड संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी हा ‘स्मार्ट पॅच’ तयार केला आहे. या पॅचमध्ये अतिशय सूक्ष्म सुया आहेत, ज्यात ‘ल्युप्रोलाईड’ नावाच्या हार्मोनचे नॅनोकण भरलेले असतात. या पॅचचे वैशिष्ट्य म्हणजे : प्रकाशामुळे सक्रिय होणारे औषध : यातील नॅनोकणांवर एक खास आवरण असते, जे कमी ऊर्जेच्या ‘निअर-इन्फ्रारेड लाईट’च्या संपर्कात येताच विरघळते आणि औषध शरीरात सोडले जाते. कमी वेदना : हा पॅच त्वचेवर लावल्यावर इंजेक्शन्ससारख्या तीव्रवेदना होत नाहीत. स्वयंचलित टायमिंग : हा प्रकाश विशिष्ट वेळी सुरू होण्यासाठी प्री-प्रोग्राम केला जाऊ शकतो, ज्यामुळे दररोज एकाच ठरावीक वेळी औषध आपोआप शरीरात पोहोचते.
अभ्यासाच्या मुख्य लेखिका आणि मटेरिअल केमिस्ट मार्ता सेरुटी यांनी सांगितले की, ‘आयव्हीएफ अपयशी ठरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे, औषधे दररोज ठरावीक वेळी न घेतली जाणे.’ सध्या रुग्णांना स्वतःलाच ही इंजेक्शन्स टोचून घ्यावी लागतात, जे अनेकांसाठी भीतीदायक आणि गैरसोयीचे असते. हा पॅच ही समस्या सोडवू शकतो. नोव्हेंबर 2025 मध्ये ‘स्मॉल’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, उंदरांवर करण्यात आलेली ही प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे. यात कोणतीही बाह्य अपायकारक द्रव्ये शरीरात न सोडता वेदनारहित पद्धतीने हार्मोन वितरण शक्य झाले आहे. सुरुवातीला संशोधक या पॅचचा वापर कर्करोगाच्या रुग्णांना औषधे देण्यासाठी करण्याचा विचार करत होते. मात्र, पीएच.डी. विद्यार्थिनी विविएन टॅम हिच्या सूचनेवरून आयव्हीएफ रुग्णांसाठी याचा वापर करण्यावर संशोधन केंद्रित करण्यात आले. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर मानवी उपचारांसाठी झाल्यास, आयव्हीएफ प्रक्रिया केवळ सोपीच नाही, तर अधिक यशस्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.