ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीमुळे जागतिक तापमानवाढीला नवा धोका Pudhari File Photo
विश्वसंचार

ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीमुळे जागतिक तापमानवाढीला नवा धोका

शास्त्रज्ञांचा इशारा : हवामान धोरणे ठरवताना ओझोन थराच्या बदलांचा विचार करणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीच्या संकटावर उपाययोजना करताना, ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीचा परिणामही गांभीर्याने विचारात घ्यावा, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, ओझोन वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचे तापमान पूर्वीच्या अंदाजापेक्षा तब्बल 40 टक्क्यांनी अधिक वाढू शकते, असे स्पष्ट झाले आहे.

ओझोन वायू पृथ्वीला सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण देतो; मात्र जमिनीच्या जवळपास तो हरितगृह वायू म्हणून उष्णता अडकवण्याचे काम करतो. त्यामुळे, ओझोन थराची पुनर्प्राप्ती होत असताना त्याचा हवामान बदलावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

2050 पर्यंत कार्बन डायऑक्साईडनंतर ओझोनचा सर्वाधिक वाटा?

या अ‍ॅटमॉसफेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्स या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, 2050 पर्यंत ओझोन वायू हा कार्बन डायऑक्साईडनंतर दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा जागतिक तापमानवाढीचा कारणीभूत घटक ठरू शकतो. त्यामुळे, हवामान धोरणे ठरवताना ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीचा आणि त्याच्या संभाव्य परिणामांचा समावेश करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हवामान धोरणांसाठी नवे आव्हान

संशोधकांच्या मते, ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीमुळे हवामान बदलाच्या लढाईत नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे, कार्बन डायऑक्साईडसह इतर हरितगृह वायूंच्या नियंत्रणाबरोबरच ओझोनच्या भूमिकेवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT