Moon soil oxygen | आता चंद्राच्या ‘माती’तून मिळणार ऑक्सिजन! 
विश्वसंचार

Moon soil oxygen | आता चंद्राच्या ‘माती’तून मिळणार ऑक्सिजन!

‘ब्ल्यू ओरिजिन’ची कामगिरी : अंतराळातील श्वसनाचा प्रश्न सुटणार?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आतापर्यंत आपण चंद्रावर पाणी शोधण्याच्या मोहिमांविषयी ऐकले असेल; पण आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची अंतराळ संशोधन कंपनी ‘ब्ल्यू ओरिजिन’ने अशी कामगिरी केली आहे, जी कालपर्यंत केवळ विज्ञानपटातील कल्पनेसारखी वाटत होती. कंपनीने प्रयोगशाळेत चंद्राच्या मातीपासून (ज्याला शास्त्रज्ञ ‘रेगोलिथ’ म्हणतात) शुद्ध ऑक्सिजन मिळवून जगाला चकित केले आहे. या यशामुळे आता तो दिवस लांब नाही, जेव्हा मानवाला चंद्रावर पृथ्वीप्रमाणेच ऑक्सिजन सिलिंडरशिवाय श्वास घेणे शक्य होईल.

चंद्राची माती ही काही साधारण धूळ नाही. यामध्ये सुमारे 45 टक्के ऑक्सिजन साठलेला असतो; परंतु तो सिलिका, लोह आणि अ‍ॅल्युमिनियम यासारख्या खनिजांसोबत जखडलेला असतो. ब्ल्यू ओरिजिनच्या ‘ब्ल्यू अल्केमिस्ट’ टीमने हा ऑक्सिजन बाहेर काढण्याची नवी पद्धत शोधली आहे. सर्वात आधी त्यांनी चंद्राच्या मातीसारखीच कृत्रिम माती एका मोठ्या भट्टीत 1,600 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर तापवली. इतकी उष्णता की दगडही पाण्यासारखे वितळले. मोल्टन रेगोलिथ इलेक्ट्रोलिसिस : ही माती द्रव रूपात आल्यानंतर त्यातून विजेचा प्रवाह सोडला जातो. या प्रक्रियेमुळे ऑक्सिजनचे रेणू खनिजांपासून वेगळे होतात आणि वायूच्या रूपात बाहेर पडू लागतात. आतापर्यंत अंतराळ मोहिमांमध्ये ऑक्सिजनचे सर्वात मोठे आव्हान होते.

अंतराळवीरांना लागणारा सर्व ऑक्सिजन पृथ्वीवरून पाठवावा लागतो, जो अत्यंत महागडा आणि कठीण व्यवहार आहे. जर चंद्रावरच ऑक्सिजन तयार होऊ लागला, तर ही समस्या कायमची सुटू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे चंद्रावर वस्ती करण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील : 1. रॉकेट इंधन : या ऑक्सिजनचा वापर रॉकेट इंधन बनवण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात चंद्रावरूनच रॉकेट उड्डाण करू शकतील. 2. बांधकाम साहित्य : या प्रक्रियेतून उरलेल्या मातीचा वापर चंद्रावर घरे किंवा बेस बनवण्यासाठी बांधकाम साहित्य म्हणून करता येईल. हा प्रयोग सध्या प्रयोगशाळेपुरता मर्यादित आहे. चंद्रावरील टोकाचे तापमान, कमी गुरुत्वाकर्षण आणि ऊर्जेच्या मर्यादा या परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान यशस्वी करणे हे मोठे आव्हान असेल. या प्रक्रियेसाठी सुमारे 1 मेगावॅट ऊर्जेची गरज भासू शकते, ज्यासाठी चंद्रावर मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल लावावे लागतील.

भविष्यातील आशेचा किरण

‘नासा’देखील चंद्रावर मानवाचा स्थायी तळ बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. अशा परिस्थितीत ब्ल्यू ओरिजिनसारख्या खासगी कंपन्यांचे हे तंत्रज्ञान भविष्यातील मोहिमांचा कणा ठरू शकते. जर सर्व काही नियोजित पार पडले, तर येणार्‍या काही वर्षांत चंद्रावर मानवाचे राहणे, काम करणे आणि कदाचित शेती करणे ही सामान्य गोष्ट होईल. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ अंतराळासाठीच नाही, तर पृथ्वीवरील संसाधनांचा मर्यादित वापर करण्याच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठीही होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT