न्यूयॉर्क : अर्जेंटिनाच्या किनार्याजवळ खोल समुद्रात सुरू असलेल्या एका मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांनी 40 हून अधिक अशा सागरी प्रजातींचे आश्चर्यकारक फुटेज टिपले आहे, ज्या यापूर्वी कधीही पाहिल्या गेल्या नव्हत्या. या मोहिमेचा अनपेक्षित स्टार ठरला आहे, तो म्हणजे एक गुबगुबीत दिसणारा तारामासा. हा तारामासा प्रसिद्ध कार्टून ‘स्पंजबॉब स्क्वेअरपँटस्’मधील ‘पॅट्रिक स्टार’ या पात्राची आठवण करून देतो.
अर्जेंटिनाच्या ‘मार डेल प्लाटा’ या पाणबुडी खोर्यात 23 जुलैपासून ‘सुबॅस्टियन’ नावाच्या रिमोट-ऑपरेटेड व्हेईकलच्या सहाय्याने हे संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञ या मोहिमेचे हाय-डेफिनिशन थेट प्रक्षेपण करत असून, दुर्मीळ सागरी जीवांवर रिअल-टाईममध्ये माहिती देत आहेत. या मोहिमेत मांसाहारी स्पंज, पारदर्शक मासे, विविधरंगी रे मासे आणि प्रवाळ यांसारख्या अनेक जीवांचा शोध लागला आहे, ज्यांची दक्षिण अटलांटिक महासागरात यापूर्वी कधीही नोंद झाली नव्हती. हा भाग जैवविविधतेने समृद्ध असूनही अद्याप अज्ञात आहे.
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला हा तारामासा ‘हिपॅस्टेरिया’ (Hippasteria) प्रजातीचा आहे, जो त्याच्या जाड मध्यवर्ती चकती आणि लहान, जाड भुजांसाठी ओळखला जातो. या तारामाशाच्या विचित्र शरीररचनेबद्दल शास्त्रज्ञांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. हे तारामासे खादाड मांसाहारी असतात, त्यामुळे कदाचित त्याने भरपूर खाल्ले असल्यामुळे तो गुबगुबीत दिसत असावा. ‘नॅशनल सायंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च कौन्सिल’ आणि ‘श्मिट ओशन इन्स्टिट्यूट’ यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत केवळ हा तारामासाच नाही, तर आणखी एका सागरी जीवाने लोकांचे मन जिंकले आहे.
कॅमेर्यात कैद झालेला दुसरा जीव म्हणजे ‘बेंथोडायटिस’ (Benthodytes) प्रजातीची एक जांभळी सागरी काकडी (violet sea cucumber). तिच्या गुबगुबीत शरीरामुळे आणि जांभळ्या रंगामुळे तिला प्रेमाने ‘बतातिता‘ (Batatita) असे टोपणनाव मिळाले आहे, ज्याचा अर्थ ‘छोटे रताळे’ असा होतो. मोहिमेतील शास्त्रज्ञांनी सांगितले की, या जीवाला पृष्ठभागावर आणण्यात आले असून, तो जिवंत आणि पूर्णपणे सुरक्षित आहे.