न्यूयॉर्क : अमेरिकेतील वर्ल्ड टे्रड सेंटरवर 9/11 रोजी (11 सप्टेंबर 2001) अल-कायदाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. मात्र, अजूनही या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 1,100 पेक्षा जास्त लोकांची ओळख पटलेली नाही. डीएनए नमुन्यांची अपुरी उपलब्धता आणि काळाच्या ओघात पुरावे नष्ट झाल्यामुळे मृतांची ओळख पटविण्यात अमेरिकेसारख्या सुपर पॉवरमधील शास्त्रज्ञांना अपयश आले आहे.
न्यूयॉर्क सिटी ऑफिस ऑफ द चीफ मेडिकल एक्झामिनर (ओसीएमई) नुसार, वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 2,753 जणांचा मृत्यू झाला होता; पण अजूनही 1,100 हून अधिक लोकांचे अवशेष अपरिचित आहेत. एका माजी अधिकार्याने सांगितले की, हल्ल्यानंतर महिनाभर बचाव कार्य सुरू होते. त्यावेळी हजारो पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि स्वयंसेवक तिथे काम करत होते. यामुळे, घटनास्थळावरील अवशेष दूषित आणि खराब झाले, ज्यामुळे डीएनए गोळा करणे अधिक कठीण झाले.
त्याचप्रमाणे, मॅनहॅटनमधील वार्यामुळे अनेक अवशेष दूर फेकले गेले आणि मोठ्या प्रमाणात ढिगारे स्टॅटन आयलंडमधील लँडफिलमध्ये हलवले गेले, जिथे ते योग्यप्रकारे साठवले गेले नव्हते, याचाही परिणाम अवशेषांची ओळख पटविण्यावर झाला.
गेल्या 24 वर्षांत डीएनए विश्लेषण तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे. तरीही, हल्ल्यातील आग, पाणी, जेट इंधन, रसायने आणि सूर्यप्रकाश यांसारख्या घटकांमुळे अवशेषांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे, डीएनएचे नमुने इतके खराब झाले आहेत की, त्यांचे त्यांच्या नातेवाईकांसोबत जुळणी करणे शक्य होत नाही. तरीही, ओसीएमईने आपले प्रयत्न थांबवलेले नाहीत. त्यांच्या प्रयोगशाळेत आजही 8,000 पेक्षा जास्त ओळख न पटलेले हाडांचे तुकडे आणि टिश्यूज सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. गत वर्षी, डीएनए तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांमुळे, तीन नवीन पीडितांची ओळख पटवण्यात यश आले आहे.
ओसीएमईचे फॉरेन्सिक बायोलॉजीचे सहायक संचालक मार्क डिझायर यांनी सांगितले की, ‘भविष्यात तंत्रज्ञानात आणखी प्रगती होईल, ज्यामुळे आपण आज जे करू शकत नाही ते उद्या नक्कीच करू शकू.’ या आशावादामुळे, 9/11 च्या सर्व पीडितांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना शांतता आणि न्याय देण्याचा प्रयत्न सुरूच आहे.