जेरुसलेम : इस्रायलचे नाव काढले की, डोळ्यांसमोर प्रगत तंत्रज्ञान, वाळवंटातील शेती किंवा युद्धनीती येते. मात्र, याच इस्रायलमधील ‘किबुत्झ’ (सामुदायिक गावे) आणि शहरांच्या गल्लीबोळांत असा एक समाज राहतो, जो अस्खलित हिब्रू बोलतो; पण त्यांच्या घरात आजही कढीपत्त्याच्या फोडणीचा सुगंध येतो आणि घरातील वडीलधारी मंडळी आजही मराठी किंवा मल्याळममध्ये गप्पा मारतात. हे आहेत भारतातून गेलेले ज्यू, जे इस्रायलला आपली ‘पितृभूमी’ तर भारताला आपली ‘मातृभूमी’ मानतात.
विविध आकडेवारीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे 85,000 ते 90,000 भारतीय वंशाचे ज्यू राहतात. यामध्ये मुख्यत्वे चार समुदायांचा समावेश आहे :
बेने इस्रायल : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातून गेलेला हा सर्वात मोठा समुदाय असून, त्यांची भाषा मराठी आहे. कोचीन ज्यू: केरळच्या मलबार किनारपट्टीवरून गेलेले (मल्याळम भाषिक). बगदादी ज्यू : मुंबई आणि कोलकाता येथे स्थायिक झालेले.
बनी मेनाशे : ईशान्य भारतातील मणिपूर आणि मिझोरममधून गेलेले. इस्रायलमधील नेगेव वाळवंटाजवळ वसलेल्या ‘दिमोना’सारख्या शहरात किंवा अनेक किबुत्झमध्ये गेल्यावर तुम्हाला आपण महाराष्ट्रातील एखाद्या गावात आहोत, असा भास होईल. येथे आजही संध्याकाळच्या चहासोबत ‘कांदे पोहे’ किंवा रात्रीच्या जेवणात ‘पुरणपोळी’ आवडीने खाल्ली जाते. तर कोचीनच्या ज्यूंच्या घरात आजही दक्षिण भारतीय चवीचा ‘मसाला डोसा’ मानाचे स्थान टिकवून आहे.
भारतीय ज्यूंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संमिश्र संस्कृती. त्यांनी इस्रायलमध्ये जाऊनही भारतीय परंपरा जपल्या आहेत:
मलिदा समारंभ : बेने इस्रायल समुदायात कोणत्याही शुभ कार्याला ‘मलिदा’ अर्पण केला जातो. यावर भारतीय स्थानिक संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे.
मेहंदी आणि संगीत : लग्नामध्ये आजही मेहंदी आणि संगीत यांसारखे कार्यक्रम उत्साहात साजरे होतात. विशेष प्रसंगी येथील महिला आजही भारतीय सिल्क साड्या नेसणे पसंत करतात. पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौर्यावेळी हा समुदाय एक भक्कम ‘सांस्कृतिक पूल’ म्हणून जगासमोर आला. हे लोक केवळ इस्रायलच्या सैन्यात आणि अर्थव्यवस्थेत योगदान देत नाहीत, तर त्यांनी इस्रायली नागरिकांना बॉलीवूड आणि योगाची ओळख करून दिली आहे.