लंडन : आपण ज्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेत राहतो, ती आपल्याला वाटते तितकी एकटी नाही. तिच्याभोवती आपण आजवर कधीही न पाहिलेल्या डझनभर लहान आकाशगंगांचे अद़ृश्य जाळे असू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एका नव्या आणि अत्यंत अचूक संगणकीय मॉडेलच्या आधारे, शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, आपल्या आकाशगंगेभोवती सध्या ज्ञात असलेल्या उपआकाशगंगांव्यतिरिक्त 100 हून अधिक ‘छुपे तारे-विश्व’ फिरत असू शकतात.
जर भविष्यात दुर्बिणींद्वारे या अतिरिक्त उपआकाशगंगांचा शोध लागला, तर ते ब—ह्मांडाच्या निर्मितीबद्दलच्या आपल्या सध्याच्या समजुतीला एक भक्कम आधार देईल. इंग्लंडमधील डरहॅम येथे रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या राष्ट्रीय खगोलशास्त्र बैठकीत शास्त्रज्ञांनी आपले हे क्रांतिकारी संशोधन सादर केले. या संशोधनाचे नेतृत्व करणार्या डरहॅम विद्यापीठाच्या इसाबेल सँटोस-सँटोस यांनी सांगितले, ‘सध्या आपल्याला आकाशगंगेच्या सुमारे 60 सहचर किंवा उपआकाशगंगा माहिती आहेत; पण आमचा अंदाज आहे की, याव्यतिरिक्त डझनभर लहान आणि अंधूक आकाशगंगा आपल्या आकाशगंगेच्या अगदी जवळून फिरत आहेत. लवकरच आपण या ‘हरवलेल्या’ आकाशगंगांना पाहू शकू, जे अत्यंत रोमांचक असेल आणि त्यातून आपल्याला ब—ह्मांडाच्या निर्मितीबद्दल अधिक माहिती मिळेल. हे संशोधन ‘डार्क मॅटर’ म्हणजेच कृष्णपदार्थाच्या आतापर्यंतच्या सर्वात अचूक सिम्युलेशनवर आधारित आहे. ‘डार्क मॅटर’ हा एक रहस्यमय, अद़ृश्य पदार्थ आहे, जो ब—ह्मांडाच्या निर्मिती आणि विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावतो. डार्क मॅटरच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकाशगंगांना त्यांचा विशिष्ट आकार मिळतो.