Four eyed ancestors | आपल्या ‘पूर्वजां’ना होते चक्क ‘चार डोळे’! 
विश्वसंचार

Four eyed ancestors | आपल्या ‘पूर्वजां’ना होते चक्क ‘चार डोळे’!

50 कोटी वर्षांपूर्वीच्या जीवांचा नवा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग/लंडन : मानवासह सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचे सर्वात जुने पूर्वज दिसायला केवळ गोंडस नव्हते, तर ते शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी चक्क चार डोळ्यांचा वापर करत होते. चीनमध्ये सापडलेल्या दुर्मीळ जीवाश्मांच्या अभ्यासातून हा खळबळजनक खुलासा झाला आहे. सुमारे 50 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या, जबडा नसलेल्या माशांच्या शरीरात डोळ्यांच्या दोन जोड्या असल्याचे संशोधकांना आढळले आहे. संशोधकांनी या ‘फोर-आयड नूडल’ (चार डोळ्यांचा मासा) सारख्या दिसणार्‍या जीवाचे एक काल्पनिक चित्रही प्रसिद्ध केले आहे.

ब्रिस्टल विद्यापीठातील मॅक्रोइव्होल्यूशनचे असोसिएट प्रोफेसर आणि या अभ्यासाचे सह-लेखक जेकब विन्थर यांनी सांगितले की, ‘या शोधामुळे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीबद्दलचा आमचा द़ृष्टिकोन बदलला आहे. आमचे पूर्वज एका धोकादायक जगात वावरणारे आणि द़ृष्टीच्या बाबतीत अत्यंत प्रगत प्राणी होते.‘मानवाचा उगम ज्या पृष्ठवंशीय परंपरेतून झाला आहे, त्याचा मागोवा ‘मायलोकनमिंगिडस्’ (Myllokunmingids) नावाच्या या जबडा नसलेल्या माशांपर्यंत घेता येतो. आज आपल्या जवळच्या बहुतांश नातेवाईकांना (प्राण्यांना) दोन डोळे आहेत; परंतु त्याकाळी या जीवांना सुरक्षिततेसाठी अधिक डोळ्यांची गरज होती. हे जीव 518 दशलक्ष वर्षांपूर्वी ‘कॅम्ब्रियन कालखंडात’ अस्तित्वात होते.

पृथ्वीच्या इतिहासातील हा असा काळ होता जेव्हा समुद्रात मोठ्या शिकारी प्राण्यांचा उदय होत होता. ‘त्या वातावरणात चार डोळे असल्यामुळे या प्राण्यांना अधिक मोठ्या क्षेत्रावर लक्ष ठेवणे शक्य झाले असावे, जे शिकारी प्राण्यांपासून वाचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते,’ असे विन्थर यांनी स्पष्ट केले. दक्षिण चीनमधील ‘चेंगजियांग’ येथील जीवाश्म साठ्यांमध्ये अत्यंत सुस्पष्ट अशा जीवाश्मांचा अभ्यास करताना हा शोध लागला. संशोधकांना दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या (करळर्ज्ञेीळलहींहूी शीलरळर्लीपशपीळी आणि एक निनावी प्रजाती) डोक्याच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे डोळे आणि मध्यभागी दोन लहान डोळे आढळले.

युनान विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मुख्य लेखक पेइयुन काँग म्हणाले, ‘सुरुवातीला आम्ही मोठ्या डोळ्यांच्या रचनेचा अभ्यास करत होतो; पण त्यांच्यामध्ये दोन लहान आणि पूर्णपणे कार्यक्षम डोळे पाहून आम्हाला प्रचंड आश्चर्य वाटले.’ संशोधकांच्या मते, हे दोन लहान डोळे गोलाकार होते आणि त्यामध्ये भिंग व प्रकाश शोषून घेणारे रंगद्रव्य होते. विशेष म्हणजे, हे दोन अतिरिक्त डोळे आजच्या काही आधुनिक पृष्ठवंशीय प्राण्यांमधील डोळ्यांसारख्या अवयवांचे आणि मानवातील पिनियल ग्रंथीचे पूर्वसुरी असू शकतात. हीच ग्रंथी मानवामध्ये झोपेचे चक्र नियंत्रित करण्यास मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT