HIV cure stem cell transplant | स्टेम सेल ट्रान्सप्लांटमुळे ‘ओस्लो पेशंट’ एचआयव्हीमुक्त 
विश्वसंचार

HIV cure stem cell transplant | स्टेम सेल ट्रान्सप्लांटमुळे ‘ओस्लो पेशंट’ एचआयव्हीमुक्त

पुढारी वृत्तसेवा

ओस्लो : वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत दुर्मीळ आणि चमत्कारी घटनेत, एका 63 वर्षीय व्यक्तीला (ज्याला ‘ओस्लो पेशंट’ म्हणून ओळखले जाते) एचआयव्ही संसर्गातून पूर्णपणे मुक्त घोषित करण्यात आले आहे. स्टेम सेल ट्रान्सप्लांटच्या मदतीने त्याच्या संपूर्ण रोगप्रतिकारक शक्तीची पुनर्रचना करण्यात आली, ज्यामुळे हा चमत्कार घडला आहे.

यापूर्वी अशा प्रकारचे उपचार घेतलेले मोजकेच रुग्ण दीर्घकालीन उपचारात यशस्वी झाले होते. मात्र, या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे, या रुग्णाला त्याच्या स्वतःच्या भावाकडून स्टेम सेल्स (मूळपेशी) मिळाले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या भावाच्या शरीरात अशी आनुवंशिक उत्परिवर्तन (Genetic Mutation) होती, जी एचआयव्हीला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते. सोमवार, 13 एप्रिल रोजी ‘नेचर मायक्रोबायोलॉजी’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. एचआयव्ही विषाणू मानवी शरीरातील पेशींवर हल्ला करण्यासाठी एका विशिष्ट प्रथिनाचा (Protein) वापर करतो. याला ‘CCR5’ असे म्हणतात. ओस्लो पेशंटच्या भावामध्ये ‘CCR5 डेल्टा 32’ नावाचे एक दुर्मीळ म्युटेशन आहे. हे म्युटेशन त्या प्रथिनाला निकामी करते, ज्यामुळे विषाणू पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. ओस्लो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील रक्तशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक डॉ. अँडर्स इविंड मायहरे यांनी सांगितले की, ‘एखाद्या भावंडाचे स्टेम सेल्स जुळण्याची शक्यता 25 टक्के असते आणि त्यातही उत्तर युरोपीय लोकांमध्ये या विशिष्ट म्युटेशनची शक्यता केवळ 1 टक्का असते. त्यामुळे, हे घडणे म्हणजे एकाच वेळी दोन लॉटरी लागण्यासारखे दुर्मीळ आहे.’

2006 पासून सुरू होता लढा

2006 : वयाच्या 44 व्या वर्षी रुग्णाला एचआयव्ही झाल्याचे निदान झाले.

2010 : त्याने अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) सुरू केली, ज्यामुळे विषाणूची पातळी अत्यंत कमी झाली.

2017 : रुग्णाला थकवा जाणवू लागला आणि रक्तातील पेशींचे प्रमाण कमी झाले.

2018 : त्याला ‘मायलोडास्पलास्टिक सिंड्रोम’ (Myelodysplastic Syndrome) नावाचा अस्थिमज्जा (Bone Marrow) कॅन्सर असल्याचे निदान झाले. कॅन्सरवरील उपचारांना सुरुवातीला यश आले; पण नंतर आजार पुन्हा बळावला. अखेर डॉक्टरांनी ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ करण्याचा निर्णय घेतला.

पुनर्निर्मित रोगप्रतिकारक शक्ती

या प्रक्रियेत, शरीरातील आजारी पेशी बदलून तिथे निरोगी स्टेम सेल्स टाकले जातात. हे नवीन स्टेम सेल्स शरीरात वाढतात आणि नवीन लाल व पांढर्‍या पेशी तयार करतात. या नवीन पेशींमध्ये एचआयव्हीशी लढण्याची नैसर्गिक क्षमता असल्याने, ओस्लो पेशंटची संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती आता एचआयव्हीमुक्त आणि अधिक सक्षम झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT