मॉस्को : रशियातील पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मध्ययुगीन काळातील रानडुकराचा एक अत्यंत दुर्मीळ सुळा सापडला आहे. हा सुळा कदाचित त्या काळातील एखादा योद्धा किंवा उच्चभ्रू व्यक्ती स्वतःचे नशीब उजळण्यासाठी ‘लकी चार्म’ किंवा ताईत म्हणून वापरत असावी, असा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. हा अनोखा सुळा १२ व्या शतकाच्या मध्यापासून ते १३ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील आहे. त्यावर नक्षीकाम केलेले धातूचे आवरण बसवण्यात आले आहे. रशियातील सर्वात जुन्या आणि प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या ‘नोव्हगोरोड द ग्रेट’ येथे उत्खननादरम्यान हा ऐतिहासिक ठेवा सापडला.
लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या पुरातत्त्व विभागातील धातू शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या सहलेखिका नतालिया एनियोसोवा यांनी सांगितले, ‘हा सुळा त्याच्या मोठ्या आकारामुळे अत्यंत असाधारण ठरतो. हा खूपच मोठा आहे.’ हा सुळा पूर्ण मिळालेला नाही, तरीही त्याच्या उरलेल्या भागाची लांबी ३.९ इंच (१० सेंटिमीटर) असून त्याची रुंदी १.१ इंच (२.८ सेमी) आहे. संशोधकांच्या मते, हा सुळा ज्या रानडुकराचा होता, त्याचे वय किमान ८ वर्षे आणि वजन २२० पाऊंड (१०० किलो) पेक्षा जास्त असावे. एनियोसोवा म्हणाल्या, ‘अशा महाकाय प्राण्याची शिकार केवळ अन्नासाठी केली जाणे शक्य नाही,’ कारण त्या काळात अन्नासाठी पाळीव डुक्कर हा अधिक सोपा आणि सामान्य पर्याय होता. अर्थात, शिकार केल्यानंतर हे रानडुक्कर खाल्ले गेले असावे की नाही, याबद्दल निश्चित माहिती मिळालेली नाही. या ताईताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर बसवलेले धातूचे कव्हर. हे कव्हर दिसायला चांदीचे वाटत असले, तरी ते जवळपास १०० टक्के कथिलाचे (Tin - चांदीसारखे दिसणारे कथिल आणि शिसे यांचे संमिश्र) बनलेले आहे, हे पाहून एनियोसोवा यांना आश्चर्य वाटले. आजच्या काळाप्रमाणेच मध्ययुगातही कथिल हे चांदीइतके महाग किंवा मौल्यवान नव्हते. मात्र, त्या काळी युरोपमध्ये कथिलाचे स्रोत खूप कमी असल्याने ते मिळणे कठीण आणि दुर्मीळ होते. कथिलासारख्या मऊ धातूवर इतके बारीक आणि क्लिष्ट नक्षीकाम करणे अत्यंत अवघड काम होते.