वॉशिंग्टन : आपले संवेदनशील दात, हे प्रत्यक्षात सुमारे 465 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राचीन माशांच्या ‘बॉडी आर्मर‘पासून विकसित झाले असल्याचे नवे वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नलमध्ये 21 मे रोजी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात वैज्ञानिकांनी सांगितले की, प्राचीन मासळीच्या बाह्य कवचावर आढळणार्या संवेदी (sensory) ऊतींना आणि मानवाच्या दातांचा विकास करणार्या ‘जननिक टूलकिट‘ला एकाच मुळाशी जोडता येते.
‘हा अभ्यास दर्शवतो की, दात हे केवळ तोंडातच संवेदी असतात असे नाही, ते इतरत्रही संवेदनशील असू शकतात,’ असे या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि शिकागो विद्यापीठातील पुराजीवशास्त्रज्ञ डॉ. यारा हारिडी यांनी सांगितले. मूळ उद्देश होता, सर्वात जुने पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेले) प्राणी ओळखणे, यासाठी संशोधकांनी कॅम्बि—यन आणि ऑर्डोव्हिशियन कालखंडातील (541 ते 443 दशलक्ष वर्षांपूर्वी) जीवाश्मांचा अभ्यास सुरू केला. अशा प्राण्यांमध्ये ‘डेन्टाईन’ नावाच्या खवले ऊतींचे अस्तित्व हे मुख्य लक्षण मानले जाते.
मानवी दातांमध्ये ही ऊती अॅनॅमलखाली असते, तर प्राचीन माशांमध्ये ती बाह्य कवचावर उठावदार ठिपक्यांमध्ये दिसते. अत्याधुनिक सीटी स्कॅनद्वारे Anatolepis heintzi या जबड्याशिवाय असलेल्या प्राचीन माशाच्या जीवाश्मांचे परीक्षण करताना, संशोधकांना काही छिद्रांत डेन्टाईनसद़ृश ऊती आढळल्या. मात्र, पुढील तुलनात्मक अभ्यासात त्यांना लक्षात आले की, ती रचना क्रॅब्सच्या कवचावरील संवेदी अवयवांसारखी आहे. त्यामुळे A. heintzi हे मासे नसून, प्राचीन अॅर्थोपॉड प्राणी होते, हे स्पष्ट झाले. या गोंधळामुळे A. heintzi ची वर्गवारी बदलली असली, तरी त्यातून एक महत्त्वाचा शोध लागला.
प्राचीन पृष्ठवंशीय प्राणी आणि अॅर्थोपॉड्स यांनी संवेदी हेतूने एकसारख्या खनिजयुक्त ऊती तयार केल्या होत्या, ज्या पुढे जाऊन ‘डेन्टाईन’ मध्ये विकसित झाल्या आणि अखेर आपल्या दातांच्या रूपात प्रकट झाल्या. संशोधक म्हणतात, ‘दात इतके संवेदनशील का असतात, हे जर आपण उत्क्रांतीच्या नजरेतून पाहिलं, तर ते गूढ वाटत नाही. हे त्यांच्या सुरुवातीच्या संवेदी ‘आर्मर’मधून झालेल्या विकासाचेच प्रतिबिंब आहे.’