नवी दिल्ली : उपवास म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. भारतात तर साबुदाण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक उपवासाला साबुदाणा खिचडी आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ खाल्ले जातात. विशेषतः नवरात्री, गणपती, संकष्टीसारख्या सणांमध्ये साबुदाण्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो; पण आज उपवासातील लोकप्रिय अन्न म्हणून ओळखला जाणारा हा साबुदाणा एकेकाळी दुष्काळात लोकांचे प्राण वाचवणारा महत्त्वाचा अन्नस्त्रोत होता, ही गोष्ट अनेकांना माहिती नसेल. याशिवाय उपवासात महत्त्वाचा असणारा साबुदाणा हा मूळचा भारतातील नाहीच. चला या प्रदार्थाचा प्रवास कसा आहे, हे जाणून घेऊयात...
साबुदाणा हा ‘सागो पर्ल्स’ म्हणूनही ओळखला जातो. तो थेट धान्य नसून कसावा (टॅपिओका) या मुळापासून तयार केला जातो. या मुळांमधून स्टार्च काढला जातो, त्यानंतर त्याचे लहान गोल कण बनवून ते वाळवले जातात. त्यामुळे तयार होतात हे पांढरे, छोटे मोतीसारखे दाणे. हे दाणे म्हणजे साबुदाणा! बाझील आणि चीनमधून साबुदाणा भारतात पोहोचला. साबुदाण्याची भारतातील एंट्री 1800 च्या सुमारास झाली. विशेषतः, दक्षिण भारतात, खास करून केरळ भागात याचा वापर सुरू झाला. त्या काळात त्रावणकोर प्रदेशात भयंकर दुष्काळ पडला होता.
अन्नधान्याची टंचाई इतकी होती की, लोक उपासमारीने त्रस्त होते. त्यावेळी स्थानिक शासकांनी कसावा या वनस्पतीचा शोध लावला आणि तो अन्न म्हणून वापरण्याचा प्रयोग केला. सुरुवातीला लोकांना तो विषारी असू शकतो, अशी भीती वाटत होती. मात्र, योग्य पद्धतीने स्वच्छ करून, उकळून आणि प्रक्रिया करून तो सुरक्षितपणे खाण्यास योग्य बनवण्यात आला. नंतर हळूहळू लोकांचा विश्वास बसला आणि हा पदार्थ ‘कप्पा’ या नावाने लोकप्रिय झाला.
इतिहासात साबुदाण्याने अनेक वेळा लोकांना उपासमारीपासून वाचवलं आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान तांदळाची कमतरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत कसावापासून तयार होणारा साबुदाणा हा स्वस्त आणि पोटभर अन्नाचा पर्याय ठरला. त्यामुळे अनेक भागांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला.