Origin of life in universe | ब्रह्मांडात जीवसृष्टीचा उगम कसा झाला? File photo
विश्वसंचार

Origin of life in universe | ब्रह्मांडात जीवसृष्टीचा उगम कसा झाला?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली, हे विज्ञान विश्वातील सर्वात मोठे कोडे आहे. मात्र, आता एका प्रयोगशाळेतील प्रयोगाने या रहस्यावर प्रकाश टाकला आहे. अंतराळातील प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले जटिल घटक आपोआप तयार होऊ शकतात, असे एका नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे.

‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या जर्नलमध्ये 20 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, अंतराळातील किरणोत्सर्गाच्या सानिध्यात आल्यावर ‘अमीनो अ‍ॅसिडस्’ एकत्र येऊन ‘पेप्टाईड बाँडस्’ तयार करतात. हे बाँडस् म्हणजे प्रथिनांच्या निर्मितीतील पहिली पायरी असून, यातूनच पुढे एन्झाईम्स आणि पेशींची प्रथिने तयार होतात. डेन्मार्कच्या आरहूस विद्यापीठातील संशोधक अल्फ्रेड हॉकिन्सन यांच्या मते, जीवसृष्टीसाठी लागणारे सुरुवातीचे घटक अवकाशात तयार झाले असावेत आणि उल्कापाताच्या माध्यमातून ते पृथ्वीवर पोहोचले असावेत.

नासाच्या ‘ओसिरिस-रेक्स’ मोहिमेदरम्यान ‘बेन्नू’ लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांमध्ये ‘ग्लायसीन’ हे साधे अमीनो अ‍ॅसिड आढळले आहे. मात्र, त्यापेक्षा जटिल असे ‘डायपेप्टाईड’ घटक अद्याप अवकाशात सापडलेले नाहीत. खगोलभौतिकशास्त्रज्ञ सर्जिओ आयोपोलो यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंतराळातील परिस्थिती हुबेहूब निर्माण करण्यासाठी हंगेरीतील ‘सायक्लोट्रॉन’ सुविधेचा वापर केला. त्यांनी ग्लायसीनने लेपित बर्फाच्या स्फटिकांना उणे 253.15 अंश सेल्सिअस इतक्या गोठवणार्‍या तापमानात ठेवले.

अंतराळातील वातावरणाचे अनुकरण करण्यासाठी या स्फटिकांवर हाय-एनर्जी प्रोटोन्सचा मारा करण्यात आला. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी आणि मास स्पेक्ट्रोमेट्रीच्या सहाय्याने यातून तयार होणार्‍या रेणूंचे विश्लेषण करण्यात आले. ‘जर अमीनो अ‍ॅसिड अवकाशातच एकत्र येऊन अधिक जटिल बनू शकले, तर ग्रहांच्या पृष्ठभागावर जीवसृष्टी फुलण्यासाठी हा एक अत्यंत सकारात्मक पाया ठरतो,’ असे हॉकिन्सन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT