वॉशिंग्टन : पहिलेवहिले डायनासोर हे विषुववृत्ताच्या आसपास विकसित झाले असावेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. ते प्रागैतिहासिक काळातील महाखंड गोंडवानाच्या नैऋत्य भागात विकसित झाले नसावेत, असे त्यांना वाटते. गोंडवानाच्या नैऋत्य म्हणजे दक्षिण-पश्चिम भागात त्यांचा विकास झाला असे सध्या समजण्याचे कारण म्हणजे अर्जेंटिना किंवा झिम्बाब्वेसारख्या देशांमध्ये डायनासोरचे जीवाश्म विपुल प्रमाणात सापडतात. अगदी सुरुवातीच्या काळातील डायनासोरचे अवशेष हे सहारा वाळवंट किंवा अॅमेझॉनच्या वर्षावनात खोलवर गाडले गेलेले असावेत, असेही संशोधकांना वाटते.
याबाबत ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या ‘अर्थ सायन्सेस’ विषयातील पीएच.डी.चे विद्यार्थी असलेल्या जोएल हिथ यांनी संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की सहारा व अॅमेझॉनमध्ये सुरुवातीच्या काळातील अशा डायनासोरचे जीवाश्म जर सापडले तर डायनासोरच्या इतिहासाचा 23 कोटी वर्षांपेक्षाही किती तरी मागे जाऊन मागोवा घेता येऊ शकेल. सध्या सर्वात जुने डायनासोर जीवाश्म हे 23 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. मात्र त्यापूर्वीच्या व सुरुवातीच्या काळातील डायनासोरचे जीवाश्म सापडले तर डायनासोर सुरुवातीला कुठे व कसे विकसित झाले हे जाणून घेण्यास मदत मिळेल. जोएल हिथ यांनी म्हटले आहे की डायनासोरचा आतापर्यंत बराच अभ्यास झालेला आहे, पण अद्यापही आपल्याला ते कुठून आले हे समजलेले नाही. फोसाईल रेकॉर्डमध्ये इतके मोठे गॅप्स आहेत की ती त्यांना ‘फेस व्हॅल्यू’ म्हणून घेता येत नाही. सध्या असे मानले जाते की डायनासोर हे पूर्वीच्या गोंडवाना या महाखंडाच्या अतिशय दक्षिणेकडील टोकावरील भागात विकसित झाले. त्यामध्ये सध्याच्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, मध्य-पूर्वेचा काही भाग आणि अंटार्क्टिकाचा समावेश होतो. दक्षिण ब्राझिल, अर्जेंटिना आणि झिम्बाब्वेमध्ये नियमितपणे डायनासोरचे जीवाश्म सापडत असतात. त्यावरून असे सुचित होते की 251.9 दशलक्ष ते 201.3 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या ट्राएसिक काळातील मध्यास ते दक्षिण ध्रुवाकडील भागात वावरत होते. मात्र डायनासोरचा विकास ट्राएसिक काळाच्या आधीच झाला असे काही जीवाश्मांवरून सुचित होते. त्यानंतर ते जगभर पसरले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.