OPERATION SINDOOR : अवघ्या 45 मिनिटांत तयार केला होता ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो Pudhari File Photo
विश्वसंचार

OPERATION SINDOOR : अवघ्या 45 मिनिटांत तयार केला होता ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो

'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो कोणी केला डिझाइन?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, त्याने संपूर्ण पाकिस्तानला हादरवून सोडले. या कारवाईने इतका खोल परिणाम केला आहे की, पाकच्या अनेक पिढ्या ही मोहीम विसरू शकणार नाहीत. या शौर्यगाथेबरोबरच आता संपूर्ण जग ‘ऑपरेशन सिंदूर’ चा लोगो देखील लक्षात ठेवणार आहे; पण हा लोगो कोणी तयार केला? किती वेळात तयार केला? याची माहिती अनेकांना ठाऊक नाही. आता तीही उघड झाली आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने जी कारवाई केली, तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. त्या ऑपरेशनचा लोगो दोन भारतीय सैन्य अधिकार्‍यांनी तयार केला. लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह या दोघांनी मिळून हा लोगो अवघ्या 45 मिनिटांत तयार केला. भारतीय लष्कराच्या संवाद पत्रिका ‘बातचीत’ मध्ये या दोघांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पत्रिकेच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांत ‘ऑपरेशन सिंदूर’ हा लोगो आणि त्याच्या वर लष्कराचे प्रतीक छापले गेले आहे.

भारतीय सैन्यदलांनी 7 मेच्या रात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात एक्स (माजी ट्विटर) हँडल ADGPI वरून हा लोगो प्रसिद्ध केला होता. काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या अक्षरात ‘OPERATION SINDOOR’ असा मजकूर देण्यात आला. यात ‘SINDOOR’ या शब्दातील पहिला ‘ O’ सिंदूर म्हणजेच कुंकू भरलेली कटोरी किंवा करंड दाखवतो, तर दुसरा ‘O’च्या पार्श्वभूमीवर विखुरलेला सिंदूर दर्शवतो. हा लोगो देशातील अनेक नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावर मोठ्या अभिमानाने वापरला.

या लोगोचे डिझाईन ज्यांनी बनवले, त्यापैकी लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता हे पंजाब रेजिमेंटमधून आहेत, तर हवालदार सुरिंदर सिंह हे आर्मी एज्युकेशन कोअरचे सदस्य आहेत. हे दोघेही सैन्याच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन विंगमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी तयार केलेला लोगो केवळ एक डिझाईन नसून, शहिदांच्या पत्नींच्या वेदना आणि देशाच्या प्रतिशोधाच्या भावनेचे प्रतीक ठरला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या लोगोने देशवासीयांच्या मनात भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल नव्याने अभिमान निर्माण केला आहे. हा लोगो आता सामूहिक शौर्य, त्याग आणि न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT