हॅकर्सकडून मालवेअरचे कोड लिहिण्यासाठी ‘चॅट जीपीटी’ वापर. Pudhari File Photo
विश्वसंचार

मालवेअर बनवण्यासाठी हॅकर्स करीत आहेत चॅट-जीपीटीचा वापर

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘ओपन एआय’ कंपनीचे ‘चॅट- जीपीटी’ लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. त्यानंतर पाठोपाठ अनेक एआय टूल लाँच झाले. त्यांचा गैरवापरही होऊ शकतो हे त्यापूर्वीपासूनच तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. आता चॅट-जीपीटीचा गैरवापर हॅकर्स करीत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका रिपोर्टनुसार, हॅकर्स मालवेअर तयार करण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करीत आहेत. स्वतः ‘ओपन एआय’ या कंपनीनेही त्याची पुष्टी केली असून, हॅकर्स मालवेअरचे कोड लिहिण्यासाठी ‘चॅट जीपीटी’ वापरत असल्याचे म्हटले आहे.

सायबर गुन्हेगार आता ‘ओपन एआय’चे मॉडेल ‘चॅट-जीपीटी’चा मोठ्या प्रमाणात गैरवापर करू लागले आहेत. मालवेअर बनवणे, चुकीची माहिती पसरवणे आणि स्पीयर-फिशिंगसारख्या खतरनाक कृत्यांसाठी हा वापर सुरू आहे. एका नव्या रिपोर्टनुसार, 2024 च्या सुरुवातीपासूनच ‘ओपन एआय’ने जगभरातील वीसपेक्षा अधिक फसवणुकीच्या कृत्यांना आळा घातला. ‘एआय’च्या दुरुपयोगाची एक चिंताजनक प्रवृत्ती यामधून समोर आली होती. मालवेअर बनवणे व ते ठीक करणे, बनावट सोशल मीडिया व्यक्तित्त्वासाठी सामग्री तयार करणे आणि प्रभावशाली फिशिंग मेसेज बनवणे यासारख्या गोष्टी केल्या जात होत्या. ‘ओपन एआय’चे म्हणणे आहे की, आमच्या टूलचा वापर मानवतेला लाभ मिळण्यासाठी व्हावा, हा आमचा मूळ उद्देश आहे. आमच्या मॉडेलचा हानिकारक उद्देशांसाठी दुरुपयोग होण्यापासून रोखण्यासाठी कंपनी लक्ष पुरवत आहे. कंपनीने यापूर्वी अशा गोष्टींबाबत कोणतेही वक्तव्य केले नव्हते. आता मात्रकंपनीने असे प्रकार घडत असल्याची पुष्टी करून, ते रोखण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत असल्याचेही म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT