सॅन फ्रान्सिस्को : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात काम करणार्या अग्रगण्य ‘ओपन एआय’ कंपनीच्या एका अंतर्गत एआय मॉडेलने गणितातील तब्बल 80 वर्षे जुने आणि अत्यंत क्लिष्ट मानले जाणारे गणित सोडवण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, नामवंत गणिततज्ज्ञांनी या एआय मॉडेलने शोधलेले उत्तर तपासून ते अगदी अचूक असल्याचा दुजोरा दिला आहे.
एआय तंत्रज्ञान केवळ निबंध लिहिणे किंवा चित्रे तयार करण्यापुरते मर्यादित नसून, ते मानवी बुद्धीला आव्हान देणार्या कठीण वैज्ञानिक समस्याही सोडवू शकते, हे या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ओपन एआयच्या या मॉडेलने गणितातील ज्या समस्येची उकल केली आहे, ती गेल्या आठ दशकांपासून (80 वर्षे) जगभरातील गणिततज्ज्ञांसाठी एक मोठे आव्हान बनली होती. अनेक वर्षांपासून जगभरातील तज्ज्ञ यावर संशोधन करत होते; परंतु कोणालाही त्याचे परिपूर्ण उत्तर शोधता आले नव्हते. मात्र, ओपन एआयच्या नव्या प्रगत प्रणालीने आपल्या तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमतेच्या जोरावर या समस्येचे गणितीयद़ृष्ट्या अचूक उत्तर शोधून काढले.
एआयने उत्तर शोधल्यानंतर, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि गणिततज्ज्ञांच्या एका गटाने या उत्तराची सखोल पडताळणी केली. हे उत्तर केवळ वरवरचे नसून, त्यामागील तर्कशुद्धता आणि मांडणी पूर्णपणे अचूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एआयने दिलेल्या या उत्तरामुळे गणिताच्या क्षेत्रातील एका मोठ्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. हे यश ओपन एआयच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सामान्य चॅटबॉटने (उदा. ChatGPT) नव्हे, तर त्यांच्या प्रयोगशाळेत चाचणीच्या टप्प्यात असलेल्या एका ‘अंतर्गत एआय मॉडेल’ने (Internal AI Model) मिळवले आहे. हे मॉडेल प्रगत तर्कशक्ती (Reasoning) आणि कठीण समस्या सोडवण्यासाठी विशेष रूपाने विकसित केले जात आहे.