नवी दिल्ली : साधारणपणे अंड्याचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर कोंबडीचे अंडे येते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर एखादे अंडे फुटबॉलच्या आकाराचे असेल तर? जगात असा एक पक्षी आहे ज्याचे फक्त एक अंडे संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता तयार करू शकते. त्याच्या एकाच अंड्यापासून बारा लोकांसाठी ऑम्लेट बनू शकते. हे अंडे केवळ आकारानेच मोठे नाही, तर त्याची ताकद आणि वजन जाणूनही लोक थक्क होतात.
जगातील सर्वात मोठा पक्षी असणार्या शहामृगाचे अंडे हे जगातील सर्वात मोठे अंडे असते. या एका अंड्याचे वजन सरासरी 1.4 ते 2 किलो पर्यंत असते. याची लांबी 15 ते 18 सेंमी आणि रुंदी 12 ते 15 सेंमी असते. कोंबडीचे एक अंडे साधारण 50-60 ग्रॅमचे असते. म्हणजेच, शहामृगाचे एक अंडे 24 कोंबडीच्या अंड्यांच्या बरोबरीचे असते. जर आपण गणित मांडले, तर एका व्यक्तीसाठी 2 ते 3 कोंबडीच्या अंड्यांचे ऑम्लेट लागते. शहामृगाच्या एका अंड्यापासून साधारण 10 ते 12 लोकांचे ऑम्लेट आरामात बनू शकते. म्हणजेच एका मोठ्या कुटुंबाचा नाश्ता एकाच अंड्यात पूर्ण होऊ शकतो.
शहामृगाचे अंडे केवळ मोठेच नाही तर पोषक तत्त्वांनीही परिपूर्ण असते. यात सुमारे 2000 कॅलरी आणि 100 ते 168 ग्रॅम प्रोटीन असते. तसेच विटामिन बी12 आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाणही भरपूर असते. या अंड्याचे कवच 1.5 मिलिमीटर जाड आणि अत्यंत मजबूत असते. हे अंडे फोडण्यासाठी कधीकधी हातोडा किंवा ड्रिल मशिनची गरज भासते. इतक्या मजबुतीमुळेच हे अंडे हाताळणे सोपे नसते. जगातील काही भागांत शहामृगाच्या अंड्यांचा खाण्यासाठी वापर होतो; मात्र भारतात हे अत्यंत दुर्मीळ आहे. याची किंमतही सामान्य अंड्यांच्या तुलनेत खूप जास्त असते. खाण्याव्यतिरिक्त, याच्या मजबूत कवचाचा वापर शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी किंवा सजावटीसाठीही केला जातो.