बर्लिन : दररोज केवळ एक कॅनभर साखरयुक्त (शुगरी) किंवा कृत्रिमरित्या गोड केलेले (‘डाएट’) पेय पिण्यामुळे चयापचय बिघडण्याशी संबंधित स्टीएटोटिक यकृत रोग (एमएएसएलडी) होण्याचा धोका वाढू शकतो, असा निष्कर्ष एका नवीन महत्त्वपूर्ण संशोधनातून काढण्यात आला आहे.
युनायटेड युरोपियन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी वीक (यूईजी वीक) मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात, सुरुवातीला यकृत रोग नसलेल्या युकेमधील 1,23,788 लोकांचा दहा वर्षांहून अधिक काळ अभ्यास करण्यात आला. त्यातील निष्कर्षानुसार साखरयुक्त पेयांचे सेवन केल्याने एमएएसएलडी (पूर्वीचा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग) होण्याचा धोका 50 टक्क्यांनी वाढला. कमी किंवा साखर नसलेल्या पेयांचे (जसे की ‘डाएट’ सोडा) सेवन केल्याने हा धोका 60 टक्क्यांनी वाढला.
कृत्रिमरीत्या गोड केलेली पेये यकृत-संबंधित मृत्यूच्या उच्च जोखमीशी देखील संबंधित असल्याचे आढळले. जास्त साखरेमुळे रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास मदत होते. बिन-साखरेची पेये आतड्यांमधील सूक्ष्मजीवांना बदलून, भूक आणि गोड खाण्याची इच्छा वाढवून यकृताच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, एमएएसएलडी हा जागतिक आरोग्य समस्या बनत असताना, ही पेये ‘निरुपद्रवी’ आहेत या सामान्य समजुतीला नवीन संशोधनातील निष्कर्ष आव्हान देतात.