वॉशिंग्टन : नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये मोसासॉरस या महाकाय समुद्री प्राण्याबद्दल एक अनोखा शोध समोर आला आहे, जो एकेकाळी समुद्रांवर राज्य करत होता. उत्तर डकोटा येथे, जिथे टी-रेक्सचे अवशेष आढळले आहेत, त्याच ठिकाणी मोसासॉरसचा एक दात सापडला आहे. या शोधामुळे मोसासॉरस फक्त महासागरातच राहतो या आपल्या जुन्या समजुतीला आव्हान मिळाले आहे. हा दात सूचित करतो की हे तब्बल अकरा मीटर लांबीचे विशाल जीव गोड्या पाण्याच्या भागातही राहण्यास शिकले होते.
जवळपास 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मोसासॉरससारख्या समुद्री शिकारी प्राण्यांबद्दल दीर्घकाळ असे मानले जात होते की ते केवळ मोठ्या महासागरांमध्येच राहतात. परंतु, उत्तर डकोटातील गोड्या पाण्याच्या ठिकाणी मोसासॉरसचा दात सापडल्यामुळे वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले. या दाताचे आयसोटोप विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणामधून हे स्पष्ट झाले की, प्रजाती नामशेष होण्यापूर्वी आपल्या शेवटच्या काळात, मोसासॉरसने स्वतःला नद्या आणि गोड्या पाण्याच्या वातावरणात राहण्यासाठी जुळवून घेतले होते.
हा दात टी-रेक्सच्या दातांसोबत आणि मगरीच्या हाडांसोबत सापडला होता. या बदलाचे कारण त्या वेळी पृथ्वीच्या पर्यावरणात होत असलेल्या मोठ्या बदलांमध्ये दडलेले आहे. आसपासच्या ठिकाणांहून मिळालेल्या इतर मोसासॉरसच्या दातांमध्येही तसेच आयसोटोपचे संकेत आढळले आहेत. यामुळे हे निश्चित होते की मोसासॉरस त्याच्या प्रजाती नामशेष होण्यापूर्वीच्या शेवटच्या 1 दशलक्ष वर्षांमध्ये (10 लाख वर्षांमध्ये) गोड्या पाण्याच्या प्रदेशात राहू लागले होते. याचा अर्थ असा होतो की, मोसासॉरस नदीच्या गोड्या पाण्याच्या वातावरणात राहात होता आणि नामशेष होण्यापूर्वी तो नद्यांमध्ये निवास करत असे.
मोसासॉरसची अंदाजित लांबी सुमारे 11 मीटर (सुमारे 36 फूट) होती, जी सर्वात मोठ्या किलर व्हेलच्या आकाराएवढी आहे. या प्रचंड आकारामुळे, तो समुद्री आणि गोड्या पाण्याच्या दोन्ही ठिकाणी सर्वात मोठा शिकारी बनला असावा. नदीच्या प्रणालीमध्ये, तो एक असामान्य शिकारी होता.तेथे तो टी-रेक्स आणि मगरींसारख्या इतर मोठ्या प्राण्यांसोबत किंवा त्यांच्या विरुद्ध शिकार करत असेल.