Omega-3 deficiency | ‘ओमेगा-3’च्या कमतरतेने अल्झायमरला आमंत्रण? Pudhari File Photo
विश्वसंचार

Omega-3 deficiency | ‘ओमेगा-3’च्या कमतरतेने अल्झायमरला आमंत्रण?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात झपाट्याने वाढणार्‍या मेंदूच्या आजारांपैकी अल्झायमर हा विस्मरणाशी संबंधित गंभीर आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2021 च्या अहवालानुसार, जगभरात डिमेन्शिया-अल्झायमरचे सुमारे 1 कोटी नवीन रुग्ण आढळले आणि 1.95 कोटी लोकांचा डिमेन्शिया आणि अल्झायमरमुळे मृत्यू झाला. अल्झायमर हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार असून, जगभरात मृत्यू आणि विकलांगतेचे ते एक प्रमुख कारण आहे.

अल्झायमर हा मेंदूचा एक असा विकार आहे, ज्यामुळे हळूहळू स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होते. गंभीर परिस्थितीत, रुग्णांना दैनंदिन कामे करणेही कठीण होऊ शकते. ‘अल्झायमर अँड डिमेन्शिया’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, ज्या लोकांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता असते, त्यांना अल्झायमरचा धोका जास्त असतो.

वैद्यकीय अहवालांनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अल्झायमरचा धोका अधिक असतो आणि या रोगाच्या एकूण रुग्णांपैकी दोन-तृतीयांश महिला असतात. हा आजार साधारणपणे वृद्धांमध्ये दिसून येतो, पण आता तरुणही याला बळी पडू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संशोधकांनी अल्झायमर आणि निरोगी व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यात असे दिसून आले की, अल्झायमर असलेल्या महिलांमध्ये असंतृप्त फॅटस्, जसे की ओमेगा फॅटी अ‍ॅसिडची पातळी 20 टक्के कमी होती. मात्र, अल्झायमर असलेल्या पुरुषांमध्ये ही कमी पातळी दिसून आली नाही.

यावरून असे सूचित होते की, या रोगाचे परिणाम आणि कारणे लिंगानुसार वेगवेगळी असू शकतात. किंग्स कॉलेज लंडनच्या वरिष्ठ लेखिका डॉ. क्रिस्टिना लेगिडो-क्विगली म्हणतात की, ‘अल्झायमरच्या कारणांबाबत पुरुष आणि महिलांमधील फरक हा सर्वात आश्चर्यकारक आणि अनपेक्षित निष्कर्ष होता. हे असे संकेत आहेत की, या पोषक तत्त्वांची कमी पातळी अल्झायमरचे कारण असू शकते.

‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिडयुक्त आहार, जसे की मेडिटेरेनियन डाएट, हृदय, मेंदू आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर मानला जातो. 2022 च्या एका अभ्यासात असे दिसून आले की, जे मध्यमवयीन लोक नियमितपणे ओमेगा-3 युक्त पदार्थांचे सेवन करतात, त्यांची संज्ञानात्मक क्षमता (cognitive ability) आणि मानसिक कौशल्ये इतरांपेक्षा अधिक चांगली होती. अल्झायमर रोगापासून बचाव करण्यासाठी आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी 12 आणि अँटिऑक्सिडंटस्चा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT