Oldest wooden weapons | मानवी इतिहासातील सर्वात जुन्या लाकडी हत्यारांचा शोध File Photo
विश्वसंचार

Oldest wooden weapons | मानवी इतिहासातील सर्वात जुन्या लाकडी हत्यारांचा शोध

4 लाख 30 हजार वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा

पुढारी वृत्तसेवा

अथेन्स : ग्रीसमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी तब्बल 4 लाख 30 हजार वर्षांपूर्वीची हाताने वापरली जाणारी लाकडी हत्यारे शोधून काढली आहेत. जगात आतापर्यंत अस्तित्वात असलेली ही सर्वात जुनी लाकडी हत्यारे असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. दक्षिण ग्रीसमधील पेलोपोनीज द्वीपकल्पावर ही दोन हत्यारे सापडली आहेत. विशेष म्हणजे, ही हत्यारे आधुनिक मानवाच्या (होमो सेपियन्स) उदयापूर्वीच्या एका अज्ञात ‘होमिनिन’ प्रजातीने तयार केली होती. संशोधकांच्या मते, या शोधामुळे लाकडी हत्यारांच्या वापराचा पुरावा किमान 40,000 वर्षांनी मागे गेला आहे.

‘पीएनएएस’ या नियतकालिकात 26 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात या हत्यारांचे वर्णन करण्यात आले आहे. मराठुसा येथे सापडलेले पहिले लाकडी साधन सुमारे 31.9 इंच (81 सेंमी) लांब आहे. त्याचे एक टोक छिन्नविछिन्न झालेले असून, त्याचा वापर जमिनीतून काहीतरी उकरून काढण्यासाठी केला जात असावा, असा अंदाज आहे. दुसरे साधन केवळ 2.2 इंच (5.7 सेंमी) लांब असून, त्याची साल पूर्णपणे काढलेली आहे. याचे एक टोक गोलाकार असून, त्यावर खुणा आहेत.

हे साधन कदाचित दगडाची हत्यारे बनवण्यासाठी वापरले जात असावे, असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे. लाकूड हे सेंद्रिय असल्याने ते लवकर कुजते, मात्र ही हत्यारे ओल्या मातीत गाडली गेली होती. तेथील ऑक्सिजनचे कमी प्रमाण असलेल्या वातावरणामुळे ही हत्यारे आणि इतर सेंद्रिय अवशेष हजारो वर्षे सुरक्षित राहू शकले. या जागेवर हत्ती, पाणघोडे, हरीण आणि रानडुकरांचे अवशेषही सापडले आहेत. त्यावेळचे युरोपमधील हवामान अत्यंत थंड होते, तरीही हा परिसर तलाव आणि पाणथळ जागेने समृद्ध होता. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ अ‍ॅनेमिक मिल्क्स यांच्या मते, ही जागा त्या काळातील आदिमानवांसाठी राहण्यायोग्य आणि सोयीस्कर होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT