विश्वसंचार

प्राचीन मकबर्‍यामध्ये सर्वात जुनी दारू

Arun Patil

माद्रिद : सुमारे पाच वर्षांपूर्वी नैऋत्य स्पेनच्या कार्मोन शहरातील एका घराचे नूतनीकरण होत असताना काही मजुरांना खोदकामावेळी एक मकबरा आढळला. या मकबर्‍यामध्ये अनेक अस्थिकलश ठेवण्यात आलेले होते. त्यापैकी एका कलशात द्रवपदार्थ भरलेला असल्याचे दिसून आले. कोर्डोबा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या कलशाचा व त्यामधील द्रवपदार्थाचा अभ्यास केला. त्यावेळी या कलशामध्ये मद्य असल्याचे निष्पन्न झाले. हा कलश दोन हजारपेक्षाही अधिक वर्षांपूर्वीचा आहे.

या कलशातील मद्याबाबत झालेल्या संशोधनाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. जोस राफेल रुइज अर्रेबोला यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, येथील कलशामध्ये मृतदेहाचे दहन केल्यानंतरचे अवशेष आहेत तसेच जळालेला हस्तिदंत आहे. तसेच सुमारे साडेचार लिटर लाल रंगाचा द्रवपदार्थ आहे. हा लाल द्रवपदार्थ म्हणजे वाईन आहे. खरे तर हे संशोधन थक्क करणारेच आहे.

याचे कारण म्हणजे वाईन सर्वसाधारणपणे लवकर बाष्पीभूत होत असते. मात्र, हजारो वर्षांनंतरही ही वाईन कलशात टिकून आहे, हे चकित करणारेच आहे. कदाचित त्या काळातील लोकांनी हे मद्य हवाबंद केले असावे. मात्र, त्यासाठी काय पद्धत वापरली हे समजलेले नाही. या मकबर्‍यामध्ये सोन्याची अंगठी आणि अन्यही काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. यावरून हे दिसते की हा मकबरा एका श्रीमंत कुटुंबाचा होता. याच ठिकाणी हे मद्यही सापडले आहे. यापूर्वी सापडलेले सर्वात जुने मद्य 1700 वर्षांपूर्वीचे असून, ते जर्मनीत सापडले होते.

SCROLL FOR NEXT