वॉशिंग्टन : आजपासून सुमारे 5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचे रूपांतर हेलियममध्ये होण्यास सुरुवात झाली आणि तो एक पूर्ण तारा बनला. या नवजात सूर्याभोवती वायू आणि धुळीचे आवरण होते. ज्यातून तो तयार झाला त्या निहारिकेतील हायड्रोजन, त्यासोबत काही अधिक जटिल रेणू देखील होते. या आवरणामधील आंतरक्रियांतून बर्फाचे आणि धुळीचे कण तयार झाले, जे वाढत गेले आणि एकमेकांशी जोडले गेले. यातील वायूंचे मोठे तुकडे देखील वेगळे झाले असावेत. आणि या सगळ्या गोंधळातूनच ग्रहांचा उदय झाला. सौरमालेतील सर्वात पहिला तयार झालेला ग्रह आणि म्हणून सर्वात जुना ग्रह, गुरू असल्याचे मानले जाते.
तो सौरमालेच्या पहिल्या 30 लाख वर्षांमध्ये तयार झाला असावा. यामुळेच तो इतका प्रचंड मोठा झाला, इतर कोणत्याही ग्रहापेक्षा खूप मोठा. गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या 318 पट आहे. गुरू आणि सूर्य यांच्यातील बॅरिसेंटर, ज्या बिंदूभोवती गुरू सूर्याची परिक्रमा करतो, तो सूर्याच्या केंद्रात नसून त्याच्या पृष्ठभागाच्या अगदी बाहेर आहे. म्हणजे गुरू तंतोतंत सूर्याभोवती फिरत नाही. गुरूच्या पाठोपाठ शनि आणि नंतर नेपच्यून आणि युरेनस तयार झाले. गुरू ग्रहांपैकी सर्वात जुना असला तरी, त्याच्या गॅनिमीड, युरोपा आणि आयो यांसारख्या चंद्रांवर आजही बदल होत आहेत; मात्र त्याचा चंद्र कॅलिस्टो हा सूर्यमालेतील सर्वात जुना पृष्ठभाग असलेला उपग्रह आहे.
याच वेळी, आतील सौरमालेत, विखुरलेल्या ढिगारातून चार खडकाळ ग्रह आणि एक बटू ग्रह उदयास येत होते. खडकाळ आदी ग्रहांना (rocky protoplanet) तयार होण्यासाठी जास्त वेळ लागला, कदाचित 100 दशलक्ष वर्षांच्या जवळ. कारण त्यांची निर्मिती खडकाळ वस्तूंमधील टक्करांवर अवलंबून होती. मंगळ ग्रह पृथ्वी आणि शुक्रापेक्षा लवकर त्याच्या सध्याच्या आकारमानापर्यंत पोहोचला असावा, पण त्याबद्दल अजून निश्चित मत नाही. खगोलशास्त्रीय वस्तूंचे वय सामान्यतः त्यांच्या पृष्ठभागावरील खड्ड्यांच्या संख्येवरून काढले जाते, परंतु ज्या ग्रहांचा पृष्ठभाग बदलत राहतो, तिथे वय निश्चित करणे कठीण होते.
गुरू सर्वात जुना ग्रह असणे निर्मिती मॉडेलनुसार तर्कसंगत असले तरी, सर्वात नवीन ग्रह शोधणे तितके सोपे नाही. जर आपण ग्रहाने त्याचे बहुतेक वस्तुमान निश्चित केले आहे आणि त्याचे गुणधर्म आज आपण पाहतो तसे आहेत, असे गृहीत धरले, तर सर्वात नवीन ग्रहाच्या शर्यतीत पृथ्वी आणि युरेनस हे दोघे राहतात. हे दोन्ही ग्रह सर्वात नवीन म्हणून उदयास येण्याचे कारण म्हणजे दोघांनीही प्रचंड मोठ्या टक्करांचा अनुभव घेतला आहे. पृथ्वी : आदिम पृथ्वीची (primordial Earth), थिया (Theia) नावाच्या मंगळ-आकाराच्या ग्रहाशी टक्कर झाली आणि या नाट्यमय घटनेतून चंद्राची निर्मिती झाली.
हे सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी घडले. चंद्राला स्थिरावण्यासाठी सुमारे 200 दशलक्ष वर्षे लागली. या धक्क्यातून सावरलेल्या पृथ्वीला आजच्या स्वरूपात येण्यासाठी अधिक वेळ लागला, जसे की महासागरांची निमिर्र्ती आणि टेक्टोनिक प्लेटस्ची निर्मिती, जे सुमारे 3.6 अब्ज वर्षांपूर्वी घडले असावे. युरेनस : सुमारे 3 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी, युरेनसची पृथ्वी-आकाराच्या जगाशी टक्कर झाली. या टकरीमुळे त्याचे अंतर्गत स्वरूप विस्कटले, तो एका बाजूवर फिरू लागला आणि त्याचे चुंबकीय क्षेत्र विचित्र झाले.