वेलिंग्टन ः सामान्यतः समुद्राच्या तळाशी राहणारा ऑक्टोपस न्यूझीलंडच्या किनार्याजवळ एका अतिवेगवान शार्कच्या पाठीवर बसून प्रवास करताना दिसला आणि हे अद्भुत दृश्य वैज्ञानिकांनी कॅमेर्यात कैद केले आहे! डिसेंबर 2023 मध्ये न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडजवळील हौराकी गल्फमध्ये समुद्र संशोधन करताना वैज्ञानिकांना हा दुर्मीळ क्षण पाहायला मिळाला.
ऑकलंड विद्यापीठाच्या समुद्रजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक रोशेल कॉन्स्टंटाईन यांनी या घटनेचे वर्णन करताना म्हटले की, आम्ही मोठ्या शॉर्टफिन माको शार्कला पोहताना पाहिले. पण त्याच्या डोक्यावर तो केशरी रंगाचा डाग काय होता? याचे कुतूहल वाटले. जेव्हा ड्रोन आणि ‘गोप्रो’चा वापर करून आम्ही स्पष्ट निरीक्षण केले, तेव्हा आम्हाला अविश्वसनीय दृश्य दिसले. एक ऑक्टोपस त्या शार्कच्या डोक्यावर बसलेला होता, आपल्या भुजांनी घट्ट पकडून! शॉर्टफिन माको शार्क हा जगातील सर्वात वेगवान शार्क असून, त्याचा वेग ताशी 74 किलोमीटरपर्यंत पोहोचतो. हा शार्क 12 फूट (3.7 मीटर) लांब आणि 1,200 पौंड (545 किलोग्रॅम) वजनाचा असू शकतो. या शार्कची 20 फूट (6 मीटर) उंच उडी मारण्याची क्षमता आहे आणि त्यांचा मुख्य आहार स्वोर्डफिश, ट्यूना आणि स्क्विडवर असतो. वैज्ञानिकांना अजूनही हा ऑक्टोपस समुद्राच्या तळापासून एका उघड्या समुद्रात राहणार्या शार्कच्या संपर्कात कसा आला, हे समजू शकलेले नाही. संशोधकांनी 10 मिनिटे या ‘शार्कटोपस’चे निरीक्षण केले आणि नंतर त्यांना त्यांच्या अनोख्या प्रवासावर सोडले!