Octopus Stuck to Face | चेहऱ्याला घट्ट चिकटला ऑक्टोपस!  
विश्वसंचार

Octopus Stuck to Face | चेहऱ्याला घट्ट चिकटला ऑक्टोपस!

पुढारी वृत्तसेवा

लंडनः समुद्राच्या तळाशी एक अथांग आणि रहस्यमय जग वसलेले आहे, असे जग ज्याचे अनेक भाग मानवाला अजूनही पूर्णपणे ठाऊक नाहीत. मात्र, पाण्यातील काही जीव असे आहेत ज्यांना सर्वसामान्य माणूस सहज ओळखतो. असाच एक विचित्र आणि रहस्यमय जीव म्हणजे ऑक्टोपस! ऑक्टोपसचे जाळ्यासारखे पसरलेले आठ हात पहिल्याच नजरेत भीती निर्माण करतात. सध्या एका मच्छिमारावर या ऑक्टोपसने असा काही हल्ला केला आहे, असा प्रकार बहुधा यापूर्वी कधीही पाहिला गेला नसेल. हा ऑक्टोपस त्याच्या चेहऱ्यावर घट्ट चिकटला आणि तो हटवताना त्याला नाकीनऊ आले!

हा थरारक व्हिडिओ ‘डेली मेल’ च्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रयत्नांनंतर अखेर हा ऑक्टोपस चेहऱ्यावरून बाजूला झाला, पण त्याआधी मच्छिमाराने केलेला संघर्ष पाहून कोणाचाही श्वास रोखला जाईल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक ऑक्टोपस मच्छिमाराच्या चेहऱ्याला पूर्णपणे चिकटलेला दिसतो. त्याने आपल्या आठही भुजा कोळ्याच्या तोंडावर आणि चेहऱ्यावर घट्ट आवळल्या. मच्छिमाराने लाख प्रयत्न करूनही ऑक्टोपसचा एकही हात चेहऱ्यावरून काढणे शक्य होत नव्हते. दृश्य पाहून एका क्षणासाठी असा भास होतो की हा जीव माणसाचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही!

ऑक्टोपसला एकूण आठ हात असतात आणि त्याच्या शरीरातील तब्बल दोन-तृतीयंश न्यूरॉन्स त्याच्या हातांमध्येच असतात. या हातांच्या साहाय्याने तो शिकार पकडतो आणि रक्त शोषून घेतो. त्याचे प्रत्येक हात स्वतंत्रपणे स्पर्श अनुभवू शकतात, प्रतिक्रिया देऊ शकतात आणि हालचाल करू शकतात. या भयानक परिस्थितीतही मच्छिमाराने धीर सोडला नाही. त्याने तशाच अवस्थेत कसाबसा एक लाकडी काठी उचलली आणि त्या काठीने ऑक्टोपसला मारण्यास सुरुवात केली. अखेर काठीच्या फटक्यामुळे ऑक्टोपसची पकड सैल झाली आणि त्याच्या हातांची पकड सुटली.

चेहऱ्यावरून सुटका होताच कोळ्याने त्याला तात्काळ पुन्हा समुद्राच्या पाण्यात फेकून दिले. हा व्हिडिओ पाहून नेटकरी प्रचंड घाबरले आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले, “आयुष्यात नवीन भीती निर्माण झाली! (New fear unlocked)” दुसऱ्या एका युझरने कोळ्याच्या धैर्याचे कौतुक करत म्हटले, “काय जबरदस्त बचाव केलाय!” तर काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “अशा जीवघेण्या परिस्थितीत ही घटना कॅमेऱ्यात नेमकी रेकॉर्ड कोण करत होते?”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT