मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या वेगाने बदल होत आहेत आणि वेअरेबल डिव्हाईसेसची मागणी वाढताना दिसत असून, यासाठी दोन प्रसिद्ध कंपन्यांनी हातमिळवणी करून आयवेअर म्हणजेच चष्मे किंवा गॉगलसाठी एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या आयवेअरची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यूपीआय-लाईट पेमेंट सिस्टीम. या चष्म्यात लवकरच यूपीआय स्कॅन अँड पे हे फिचर येणार आहे. कोणत्याही क्यूआर कोडकडे एकटक बघून हाय मेटा, स्कॅन अँड पे म्हटले की, तुमचे काम झाले. तुमचे पेमेंट लगेच होईल. कारण, हे फिचर व्हॉटस् अॅप पेमेंटशी लिंक केलेले असेल.
एकदा चार्ज केल्यानंतर हे ग्लासेस सलग 8 तास कार्यरत राहू शकतात, तर स्टँडबाय मोडवर 19 तास कार्यरत राहतात. यासोबत येणार्या चार्जिंग केसमुळे वापरकर्त्यांना अतिरिक्त 48 तासांचा पॉवर बॅकअप मिळतो. यामुळे प्रवासात चार्जिंगची चिंता भेडसावणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. या आयवेअरमुळे 3 के हाय-रिझॉल्यूशन व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते.
भारतीय बाजारपेठ लक्षात घेता कंपनीने या ग्लासेसमध्ये काही विशेष बदल उत्पादकांनी केले आहेत. एआयचे पाठबळ लाभलेल्या या आयवेअरमुळे हिंदी भाषेतूनही संवाद साधता येऊ शकेल. वापरकर्ते हाय मेटा म्हणून थेट हिंदीतून प्रश्न विचारू शकतात किंवा कॉल करू शकतात. याशिवाय, मेटा एआयमध्ये सेलिब्रिटी व्हॉईस फिचरचा समावेश करण्यात आला असून, त्यात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा आवाज इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.