Nuclear Waste Energy | अणू कचर्‍यापासून भविष्यात बनू शकेल स्वच्छ ऊर्जा Pudhari File Photo
विश्वसंचार

Nuclear Waste Energy | अणू कचर्‍यापासून भविष्यात बनू शकेल स्वच्छ ऊर्जा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एकीकडे अणू कचर्‍याची विल्हेवाट कशी लावायची, हा जगासमोरचा मोठा प्रश्न आहे, तर दुसरीकडे स्वच्छ ऊर्जेचा शोध सुरू आहे. आता या दोन्ही समस्यांवर एकच उपाय सापडू शकतो, असा दावा एका शास्त्रज्ञाने केला आहे. त्यांच्या मते, अणू कचर्‍याचा पुनर्वापर करून अणू फ्युजन (Nuclear Fusion) प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले एक दुर्मीळ समस्थानिक (Isotope) तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे सैद्धांतिकद़ृष्ट्या अमर्याद स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे शक्य होईल.

अमेरिकन केमिकल सोसायटीच्या (ACS) बैठकीत लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीचे भौतिकशास्त्रज्ञ टेरेन्स टार्नोस्की यांनी हा क्रांतिकारी विचार मांडला. त्यांच्या मते, हायड्रोजनच्या ‘ट्रिटियम’ या किरणोत्सर्गी प्रकाराला अणू कचर्‍यातून मिळवता येऊ शकते. अणू फ्युजन म्हणजे दोन अणूंना एकत्र करून प्रचंड उष्णता आणि ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया. यातून जवळजवळ प्रदूषणविरहित ऊर्जा मिळू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, फ्युजनसाठी अनेक संभाव्य प्रक्रिया असल्या, तरी ‘ट्रिटियम’ आणि हायड्रोजनचे दुसरे समस्थानिक ‘ड्युटेरियम’ यांना एकत्र करून हेलियम तयार करणे, ही सर्वात व्यवहार्य पद्धत मानली जाते. मात्र, या प्रक्रियेत दोन मोठ्या अडचणी आहेत : इंधन उपलब्धता : ट्रिटियम पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या सहज उपलब्ध नाही. ते तयार करणे अत्यंत महागडे आणि किचकट आहे, तसेच त्याचे उत्पादन मर्यादित प्रमाणातच करता येते.

व्यावसायिक वापर : अणू फ्युजनला व्यावसायिकस्तरावर यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘इग्निशन’ स्थिती शास्त्रज्ञांना अद्याप गाठता आलेली नाही. ‘इग्निशन’ म्हणजे प्रक्रियेत दिलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण होणे. यापैकी इंधनाची उपलब्धता आणि त्याचा खर्च हा अणू फ्युजनच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानला जातो. टेरेन्स टार्नोस्की यांनी सुचवलेला मार्ग या समस्येवर मात करणारा ठरू शकतो. सध्याच्या अणुभट्ट्यांमध्ये वापरानंतर जो किरणोत्सर्गी कचरा उरतो, त्यातूनच ट्रिटियम मिळवता येऊ शकते. यामुळे केवळ फ्युजनसाठी आवश्यक इंधनच मिळणार नाही, तर धोकादायक अणू कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT