वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका संशोधकाने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी एक विचित्र प्रस्ताव दिला आहे. मायक्रोसॉफ्टचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे संशोधक अँड्र्यू हेवर्ली यांनी एक अभ्यास प्रस्तावित केला आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाखाली 81 गिगाटन क्षमतेचा अणुबॉम्ब स्फोट करून 30 वर्षांचे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन शोषले जाऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अणुस्फोट म्हणजे 1961 मध्ये सोव्हिएत युनियनने केलेल्या सर्वात मोठ्या अणुचाचणीपेक्षा 1,600 पट अधिक शक्तिशाली असेल, जो 50 मेगाटनचा ‘झार बोम्बा’ (Tsar Bomba) होता. मायक्रोसॉफ्टच्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने एक विचित्र सूचना देताना म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब समुद्राखाली फोडला पाहिजे! अँड्र्यू हेवर्ली नावाच्या या अभियंत्याने एका वेबसाईटवर हा धोकादायक विचार मांडला आहे.
हेवर्ली यांचा असा विश्वास आहे की, या पद्धतीने हवामान बदलाच्या समस्येचा सामना करता येऊ शकतो. ते म्हणतात की, हा एक नवीन आणि मोठ्या प्रमाणावर केला जाणारा उपाय आहे. अँड्र्यू हेवर्ली यांच्या अभ्यासात म्हटले आहे की, ‘समुद्राखाली योग्य ठिकाणी स्फोट करून, आपण रेडिएशन आणि ऊर्जा तसेच स्फोटाने निर्माण होणारा ढिगारा मर्यादित करू शकतो. याशिवाय, आपण खडक वेगाने तोडू शकतो, ज्यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी होऊ शकते.’ त्यांच्या अभ्यासात असेही म्हटले आहे की, दरवर्षी 36 गिगाटन कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो. हेवर्ली यांचे म्हणणे आहे की जर 81 गिगाटनचा अणुस्फोट केला गेला तर 30 वर्षांपर्यंत कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन रोखता येते. हा स्फोट 1961 मध्ये सोव्हिएत युनियनने केलेल्या ‘झार बोम्बा’ चाचणीपेक्षा हजारो पटीने मोठा असेल. ‘झार बोम्बा’ तब्बल 50 मेगा टनचा बॉम्ब होता.
हेवर्ली यांना हवामान विज्ञान किंवा अणुऊर्जा अभियांत्रिकीचा कोणताही अनुभव नाही आणि त्यांना हा विचार क्रिस्टोफर नोलन यांच्या ऑस्कर जिंकणार्या ‘ओपेनहाईमर’ चित्रपट पाहून आला, पण वैज्ञानिकांनी त्यांचा सल्ला पूर्णपणे फेटाळून लावला आहे आणि म्हटले आहे की यामुळे विनाश होईल. हेवर्ली यांचा युक्तिवाद आहे की अशा स्फोटामुळे समुद्राच्या पृष्ठभागाखाली असलेले बेसाल्ट खडक धुळीत रूपांतरित होतील, ज्यामुळे रासायनिक क्रिया वेगवान होतील आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड कायमस्वरूपी खडकांमध्ये बंद होईल. ही प्रक्रिया ‘एन्हान्स्ड रॉक वेदरिंग’ (ERW) म्हणून ओळखली जाते, जी नैसर्गिकरीत्या होते, पण खूप हळू गतीने. अणुस्फोट या प्रक्रियेला अत्यंत वेगवान करू शकतो. हवामान बदलांना रोखण्यासाठी यापूर्वीही अनेक विचित्र सल्ले देण्यात आले आहेत.