वॉशिंग्टन ः अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनिता विलियम्स यांचा मुक्काम अनपेक्षितरित्या वाढला आणि त्यांच्या या मोहिमेचं साक्षीदार संपूर्ण जग झालं. आता याच अवकाशातील 9 महिन्यांचा मुक्काम संपवून अमेरिकेच्या या अंतराळवीर पृथ्वीवर परतल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.27 मिनिटांनी त्यांचे यान पृथ्वीवर उतरले. मात्र त्या ज्या ठिकाणी राहिल्या ते ठिकाण एखाद्या अवकाशातीलच कॉलनीहून कमी नाही. हे तेच ठिकाण आहे जिथून 24 तासांमध्ये 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त दिसतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे एखादी स्थायी वास्तू किंवा बांधकाम नसून ही स्थिर रचनाही नाहीय, तर सतत फिरतं असणारं हे एक यान आहे जे सतत पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतं.
पृथ्वीपासून हे यान साधारण 403 किमी अंतरावर स्थित असून त्याचा वेग आहे 17500 मैल प्रति तास. थोडक्यात ताशी 28163 किमी इतक्या वेगानं हे यान पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतं. नासाच्या माहितीनुसार हे यान एखाद्या पाच बेडरूमच्या फ्लॅटइतकं मोठं आहे. साधारण दोन बोईंग 747 जेटलायनर इतकं ते मोठं असून, तिथं 6 जणांची टीम आणि काही इतर अंतराळवीर वास्तव्य करू शकतात. सध्याच्या घडीला याच स्पेस स्टेशनवर 8 अंतराळवीर वावरत आहेत. पृथ्वीभोवती फिरणार्या या अंतराळयानाचं वजन 453592.37 किलोग्रॅम इतकं असून सर्व बाजूंनी त्याचा आकार पाहिल्यास तो एखाद्या फुटबॉलच्या मैदानाइतका मोठा ठरतो. इथं अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपाची अवकाशीय प्रयोगशाळा आहे. हे स्पेस स्टेशन पृथ्वीभोवतीची एक फेरी 90 मिनिटांत पूर्ण करतं. अर्थात त्यावर 45 मिनिटं सूर्यप्रकाशामुळं दिवस असतो तर, 45 मिनिटं रात्र असते. पृथ्वीचा व्यास 12742 किमी असून, स्पेस स्टेशनच्या कक्षेची उंची 400 किमी इतकी आहे ज्यामुळं ते इतक्या वेगानं पृथ्वीभोवती फेरी मारतं. राहिला मुद्दा हे स्पेस स्टेशन किती जुनं आहे? तर, 1998 मध्ये स्पेस स्टेशनचा पहिला टप्पा लाँच करण्यात आला होता. ज्यामध्ये पुढील दोन वर्षांमध्ये आणखी काही भाग जोडण्यात आले होते आणि तेव्हात हे ठिकाण राहण्यायोग्य झालं. काळानुरूप इथं अनेक गोष्टी जोडण्यात आल्या आणि अखेर 2011 मध्ये त्यातील कामं पूर्ण झाली.