विश्वसंचार

‘या’ शहरात नाही एकही कार!

Arun Patil

वॉशिंग्टन : श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणार्‍या माणसाच्या डोळ्यासमोर बंगला आणि त्यासमोर उभी असलेली चारचाकी गाडी येत असते. हल्ली तर जगभरात रस्ते कमी आणि मोटारी जास्त, अशी स्थिती झाली आहे. केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून नव्हे, तर गरज म्हणूनही अनेक लोक कार खरेदी करीत असतात. अर्थातच, वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणही वाढतच आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील एका शहरात कार किंवा अन्य तत्सम वाहनांवर बंदी आहे. हे ठिकाण आहे मॅकिनॅक आयलंड. या ठिकाणी वाहतुकीसाठी केवळ सायकली आणि घोडागाडीचा वापर केला जातो.

अमेरिकेच्या मिशिगनमधील मॅकिनॅक कौंटीमध्ये हे मॅकिनॅक आयलंड आहे. या ठिकाणी गेल्या 127 वर्षांपासून मोटार व्हेईकल्सवर बंदी आहे. सन 1898 पासून या ठिकाणी इंधनावर चालणार्‍या अशा गाड्यांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे या बेटवजा शहरात शोधूनही कुठे कार सापडणार नाही! अर्थातच, या ठिकाणची हवा शुद्ध आहे आणि पर्यावरण उत्तम आहे. ह्यूरन सरोवरातील या शहरात जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो. या शहराची लोकसंख्या सुमारे सहाशे आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. येथे जूनमध्ये होणारा लीलॅक फेस्टिव्हल आणि फॉल फोलिएज प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठीही अनेक लोक या ठिकाणी येत असतात. जगभरात अशी काही ठिकाणे आहेत जिथे वाहनांवर बंदी आहे आणि हवा, पाणी व एकूणच पर्यावरणाची काळजी घेतली जाते. आपल्या माथेरानपासून ते नेदरलँडच्या गिथुर्न गावापर्यंतची ही एक प्रेरणादायक यादी आहे.

SCROLL FOR NEXT