बीजिंग : चीनच्या आग्नेय भागात एक अनोखं सेल्फ-ऑपरेटेड नुडल शॉप सेंटर आहे. या सेंटरमध्ये अवघ्या 48 सेकंदात 1 वाटी नुडल्स सर्व्हकरू शकते. भारतीय चलनात येथील 1 नुडल वाटीची किंमत सुमारे 120 रुपये आहे. या अनोख्या रेस्टॉरंटमधून नुडल्सची वाटी खरेदी करण्यासाठी ग्राहक लांब रांगेत उभे असतात. हे स्वयंचलित नुडल्स रेस्टॉरंट फक्त 8 चौरस मीटरमध्ये बांधले गेले आहे आणि बीफ सूप नुडल्स, स्टिर-फ्राइड नुडल्स, मॅरीनेट केलेली अंडी आणि ग्रील्ड सॉसेज यांसारख्या साइड डिशसह 10 हून अधिक प्रकारचे नुडल्स तयार करुन देण्यासाठी सक्षम आहे.
येथे ग्राहक सेल्फ-सर्व्हिस किओस्कद्वारे ऑर्डर देतात आणि पैसे भरतात. ते त्यांच्या नुडल्स बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया एका पारदर्शक खिडकीतून पाहतात, ज्यामध्ये एक रोबोट पीठ आणि पाणी मिसळतो, कणीक मळतो, त्याला चकतीमध्ये दाबतो आणि 8 सेकंदापेक्षा कमी वेळेत त्याचे नुडल्स कापतो. यानंतर, नुडल्स व अन्य सामग्री एका वाटीत टाकले जातात आणि नंतर गरम पाणी टाकून 40 सेकंदांत अन्न शिजवले जाते. शेवटी, एक रोबोट हिरव्या कांद्यासह नुडल्सची वाटी देतो.एका ग्राहकाने नुडल्सची वाटी पूर्णपणे ताजी आणि चांगली शिजलेली असल्याचे वर्णन केले. लोक या नुडल्स रेस्टॉरंटला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक कमी खर्चाचे रेस्टॉरंट म्हणून त्याची प्रशंसा करत आहेत. त्याच वेळी, एका युजरने लिहिले, ‘अशा प्रकारे बनवलेल्या नुडल्समध्ये आत्मा असतो का? ते खरोखर चवदार असतात का?’ दुसर्या युजरने मात्र या प्रकाराची कानउघाडणी केली.
तो म्हणाला, ‘एआयने मानवांसाठी अवघड कामे बदलण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जसे की अंतराळ संशोधन किंवा खोल समुद्रातील बचाव. मानवांकडून आधीच चांगली केलेली दैनंदिन कामे ताब्यात घेऊ नयेत.’