लंडन : सिगारेट सोडण्यासाठी एक सुरक्षित पर्याय म्हणून बाजारात आलेल्या ‘वेपिंग’ने (ई-सिगारेट) आता तरुणाईला विळख्यात घेतले आहे. ब्रिटनच्या अधिकृत सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या अहवालानुसार, देशात तब्बल १० लाखांहून अधिक अशा व्यक्ती नियमित वेपिंग करत आहेत, ज्यांनी आयुष्यात कधीही साधी सिगारेट ओढलेली नाही.
लंडनमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय ग्रेसी मुंगुलूने सांगितले की, सुरुवातीला तिला वेपिंगचा तिरस्कार वाटत होता. परंतु शाळेतील मित्र-मैत्रिणींना पाहून १६ व्या वर्षी तिने वेपिंग सुरू केले आणि आज ती याच्या तीव्र आहारी गेली आहे. ‘हातात सतत काहीतरी धरून ठेवण्याची आणि तोंडात लावण्याची सवय लागते. आता वेप सोडण्याच्या विचारानेही मला भीती वाटते,’ असे ती सांगते.
भावनिक अवलंबित्व
तज्ज्ञांच्या मते, तरुण पिढी सामाजिक चिंता, एकटेपणा आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी वेपिंगचा आधार घेत आहे. टीव्ही व्यक्तिमत्त्व मालिन अँडरसन हिनेही तणावाच्या काळात वेपिंग सुरू केले होते. तिच्या मते, हे केवळ डोपामाईन मिळवण्याचे माध्यम बनले होते, ज्यामुळे तिचे मानसिक आरोग्य बिघडत चालले होते. सरतेशेवटी तिने हे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर हेलन वॉल यांच्या मते, लोक भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेपवर मानसिकदृष्ट्या अवलंबून राहत आहेत.
आकर्षक फ्लेवर्स आणि निकोटीनचा धोका
रंगीबेरंगी वेप्स आणि फळांचे गोड फ्लेवर्स यामुळे तरुणाई वेगाने याकडे आकर्षित होत आहे. ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने स्पष्ट केले आहे की, वेप्समध्ये निकोटीन हे अत्यंत व्यसन लावणारे घटक असते. सिगारेटपेक्षा वेपिंग कमी हानिकारक असले, तरी त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाहीत.
ब्रिटनमध्ये सध्या ५४ लाखांहून अधिक नागरिक वेपिंग करतात. धूम्रपान न करणाऱ्यांनी आणि १८ वर्षांखालील मुलांनी वेपिंग करू नये, असा स्पष्ट इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. आकर्षक वेष्टनांवर निर्बंध आणण्याचा विचार आता सरकार करत आहे.