बीजिंग : सध्या सोन्याच्या दरवाढीसोबतच चांदीच्या किमतींनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चांदीचा भाव ज्या वेगाने वाढत आहे, तो कुठे जाऊन थांबेल हे कोणालाच उमजेनासे झाले आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चांदीच्या विटा चक्क रस्त्यावर ठेवून भाजीपाल्यासारख्या विकल्या जात आहेत.
पहिल्या नजरेत पाहिल्यास या पांढऱ्या शुभ विटा कदाचित बर्फाच्या असाव्यात असे वाटते. मात्र, जवळून पाहिल्यावर विश्वास बसत नाही की, जी चांदी आपण दागिन्यांच्या दुकानात काचेच्या शोकेसमध्ये सजवलेली पाहतो, ती इथे जमिनीवर पडलेली आहे. एखाद्या भाजी मंडईत गर्दी व्हावी, तशी लोक ही चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. हे दृश्य चीनमधील शुबेई या शहराचे आहे. हे शहर चीनचे प्रमुख सोने आणि दागिन्यांचे केंद्र मानले जाते. येथे 15-15 किलोच्या चांदीच्या लादी (स्लॅब्स) विकल्या जात आहेत.
रेल्वे स्टेशनवर ज्याप्रमाणे मालाची ने-आण करण्यासाठी ट्रॉली वापरली जाते, तशाच साध्या ट्रॉलीवर या चांदीच्या विटा उघड्यावर नेल्या जात आहेत. चीनमध्येही चांदीच्या दरांनी नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. गेल्या आठवडाभरात किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये चांदी खरेदीची मोठी लाट आली आहे. विशेष म्हणजे, एआय इकॉनॉमी किंवा एआय डेटा सेंटर्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने औद्योगिक मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
चीनमधील सिल्व्हर फंडस्मध्येही लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. या चांदीच्या विटांवर ‘SGE’ असे लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ ‘शांघाय गोल्ड एक्स्चेंज’ (Shanghai Gold Exchange) असा होतो. याचा अर्थ ही चांदी अधिकृतपणे शुद्ध असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. साधारणपणे 15 किलोची चांदीची लादी ही मोठ्या व्यापाऱ्यांसाठी असते, मात्र सध्या सुरू असलेली ‘पॅनिक बायिंग’ (घाबरून केलेली खरेदी) हा एक नवा ट्रेंड दर्शवत आहे. जगभरात जरी डिजिटल पद्धतीने गुंतवणूक होत असली, तरी प्रत्यक्ष धातू ( Physical Metal) खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.