नवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून गर्भनिरोधकाची जबाबदारी प्रामुख्याने महिलांवरच राहिली आहे. पुरुषांकडे खात्रीशीर पर्यायांच्या नावाखाली केवळ कंडोम किंवा नसबंदी हेच पर्याय उपलब्ध होते. मात्र, आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी YCT-529 नावाच्या एका नवीन, विना-हार्मोन पुरुष गर्भनिरोधक गोळीच्या संशोधनात मोठे यश मिळवले आहे.
YCT-529 ही दररोज घेण्याची, विना-हार्मोन पुरुष गर्भनिरोधक गोळी आहे. अमेरिकेतील बायोटेक कंपनी ‘युवर चॉईस थेरप्युटिक्स’ ही गोळी विकसित करत आहे. मिनेसोटा आणि कोलंबिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ही गोळी तयार केली आहे. यापूर्वीच्या चाचण्यांमधील गोळ्यांमुळे पुरुषांमधील ‘टेस्टोस्टेरॉन’ हार्मोन्सवर परिणाम होऊन वजन वाढणे किंवा लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम दिसायचे, मात्र ही नवीन गोळी यापासून पूर्णपणे मुक्त आहे. ही गोळी पुरुषांमधील शुक्राणू बनण्याची प्रक्रिया थांबवते, पण पुरुष हार्मोन्सवर कोणताही परिणाम करत नाही.
शरीरात व्हिटॅमिन-ए पासून बनणारा एक घटक शुक्राणूंच्या विकासात मदत करतो. ही गोळी त्याच प्रक्रियेला तात्पुरती रोखते. या गोळीमुळे लैंगिक क्षमता किंवा इच्छेवर कोणताही परिणाम होत नाही. प्राण्यांवरील प्रयोगात असे दिसून आले की, गोळी घेणे बंद केल्यानंतर प्रजनन क्षमता पुन्हा पूर्ववत होते. नुकत्याच पूर्ण झालेल्या पहिल्या मानवी सुरक्षितता चाचणीमध्ये 16 निरोगी पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, यात कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी सामान्य राहिली आणि मूड किंवा लैंगिक इच्छेवर कोणताही परिणाम झाला नाही. ही गोळी गर्भधारणा रोखण्यासाठी किती प्रभावी आहे, हे पाहण्यासाठी आता मोठ्या स्तरावर चाचण्या सुरू आहेत.
शुक्राणूंची संख्या नेमकी किती कमी होते आणि गोळी बंद केल्यानंतर ती किती लवकर सामान्य होते, याचा अभ्यास केला जात आहे. ही गोळी प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी अद्याप काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. जर ही गोळी यशस्वी ठरली, तर गर्भनिरोधकाची जबाबदारी स्त्री आणि पुरुषांमध्ये समान विभागली जाईल. यामुळे महिलांवरील शारीरिक आणि मानसिक ओझे कमी होण्यास मदत होईल.