टोकियो : जपानच्या भौगोलिक नकाशातच नव्हे, तर सांस्कृतिक जीवनातही माऊंट फुजीला स्थान आहे. या पर्वतशिखराकडे जपानी लोक अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने पाहत असतात. या शिखरावर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच बर्फ दिसू लागतो. परंतु, नोव्हेंबर जवळ येऊनही जपानच्या या प्रसिद्ध शिखरावर अद्याप बर्फ दिसलेला नाही. देशाच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, 130 वर्षांपूर्वी पर्यावरणीय हालचालींची नोंद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशी विलक्षण घटना घडली आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीला माऊंट फुजीच्या शिखरावर बर्फ दिसण्यास सुरुवात होते. हे उन्हाळी गिर्यारोहणाच्या हंगामानंतर हिवाळा सुरू होण्याचे संकेत देते. परंतु, बुधवारपर्यंत माऊंट फुजीवर बर्फ दिसला नाही, असे कोफू स्थानिक हवामान कार्यालयातील हवामान अंदाज वर्तक युताका कात्सुता यांनी सांगितले.
1894 पासून कोफूच्या हवामान कार्यालयाने सामान्यत: फुजी पर्वतावर हंगामातील पहिल्या हिमवर्षावाची नोंद केली आहे. परंतु, यावर्षी वाढत्या तापमानामुळे शिखरावर बर्फ पडलेला नाही. कोफू कार्यालयातील हवामान अधिकारी शिनिची यानागी यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, जपानमध्ये उन्हाळ्यापासून तापमानवाढ आणि पाऊस कायम आहे, त्यामुळे बर्फवृष्टी झाली नाही. हा उन्हाळा जपानमधील सर्वात उष्ण उन्हाळा असल्याचे सांगितले जात आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी तापमान नेहमीच्या पातळीपेक्षा 1.76 अंश सेल्सिअस वाढले होते. सप्टेंबरमध्ये तापमान अपेक्षेपेक्षा जास्त होते; कारण उष्णकटिबंधीय प्रवाहात उत्तरेकडील बदलामुळे दक्षिणेकडून गरम हवा जपानच्या दिशेने आली. उन्हाळ्याची तीव्र उष्णता ऑक्टोबरमध्ये चांगलीच वाढली, पहिल्या आठवड्यात 74 हून अधिक शहरांमध्ये तापमान 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होते. क्लायमेट सेंट्रलने केलेल्या संशोधनाच्या मते, जपानमधील ही असामान्य ऑक्टोबर हीट हवामान बदलामुळे तिप्पट वाढली आहे. हवामान शास्त्रज्ञ युताका कात्सुता यांनी सांगितले की, शिखरांवर हिमकप तयार होण्यास उशीर होतोय, याला हवामानातील बदल अंशतः जबाबदार असू शकतो. या उन्हाळ्यात तापमान जास्त होते आणि हे उच्च तापमान सप्टेंबरपर्यंत चालू राहिले; ज्यामुळे थंड हवा कमी झाली, असे त्यांनी ‘एएफपी’ला सांगितले. यावर्षीची तीव्र उष्णता नैसर्गिक अल निनो हवामान पद्धतीवर अवलंबून होती. जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे ही उष्णता आणखी वाढली आणि हेच हवामान संकटाचे प्राथमिक कारण असल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले. माऊंट फुजीवर अद्याप बर्फ पडलेला नाही; ज्याचा परिणाम पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था, अन्न आणि पाणीपुरवठा आणि अगदी स्थानिकांच्या आरोग्यावरदेखील दिसू शकतो आणि त्यांना अॅलर्जीसारखे लक्षणे दिसू शकतात.