टोकियो : दात पडणे किंवा खराब होणे ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे. सहसा दात पडल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर लोक डेंटिस्टकडे जाऊन कृत्रिम दात बसवून घेतात. मात्र, आता जपानच्या शास्त्रज्ञांनी या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि नैसर्गिक तोडगा शोधून काढला आहे. जपानी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने माणसाचे दात पुन्हा नैसर्गिकरीत्या उगवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
जपानमध्ये झालेल्या या संशोधनात असे दिसून आले आहे की, प्रोटीन रोखल्यामुळे दातांची नवीन मुळे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. शास्त्रज्ञांनी या औषधाची पहिली चाचणी उंदरांवर केली असून, ती पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. औषधाच्या वापरामुळे उंदरांना नवीन दात आले असून, यादरम्यान त्यांच्या शरीरावर कोणताही गंभीर दुष्परिणाम किंवा समस्या पाहायला मिळाली नाही. उंदरांवरील यशस्वी चाचणीनंतर आता मानवी चाचणी केली जाणार आहे. हे ट्रायल यशस्वी झाल्यास, आगामी काळात लहान मुलांवरही याची चाचणी घेतली जाईल; विशेषतः अशा मुलांवर ज्यांना जन्मापासून किंवा काही कारणांमुळे दात आलेले नाहीत. शास्त्रज्ञांचे लक्ष्य २०३० पर्यंत हे दात पुन्हा उगवण्याचे उपचार जगभरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आहे. सध्या दात पडल्यास रूट कॅनाल किंवा महागडे इम्प्लांटस् करावे लागतात; पण जपानी शास्त्रज्ञांचे हे औषध जर अंतिम चाचणीत यशस्वी ठरले, तर वैद्यकीय क्षेत्रात आणि विशेषतः डेंटल (दंतवैद्यकीय) जगतात ही एक खूप मोठी आणि ऐतिहासिक क्रांती ठरेल.