वॉशिंग्टन : सोशल मीडियावर एका पेंग्विनचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एकटाच असलेला ‘ॲडेली पेंग्विन’ आपल्या सर्वाना सोडून अंटार्क्टिकाच्या बर्फात एकटाच धावताना दिसत आहे. या पेंग्विनच्या रस्त्यात दूरवर केवळ बर्फच दिसत असून, त्याच्या आसपास कोणीही नाही. सोशल मीडियावर याला ‘निहिलिस्ट पेंग्विन’चा ‘डेथ मार्च’ म्हटले जात आहे. सहसा पेंग्विन कधीही आपल्या कळपापासून वेगळे होत नाहीत, ते नेहमी समूहानेच स्थलांतर करतात.
मात्र, पहिल्यांदाच एखादा पेंग्विन असा एकटा दिसला आहे. या व्हिडीओने अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना भावुक केले असून, लोक याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आपले विचार मांडत आहेत. पेंग्विनचा हा व्हिडीओ ‘वर्नर हर्जोग’ मधील ‘एनकाऊंटर्स एट द एंड ऑफ द वर्ल्ड’ या डॉक्युमेंटरीमधील आहे. यावर सध्या अनेक मीम्सदेखील बनत आहेत. मीम्स बनवणाऱ्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव सामील झाले आहे. नुकताच व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते पेंग्विनचा हात धरून ग््राीनलँडच्या दिशेने जाताना दिसत आहेत, तर पेंग्विनच्या हातात अमेरिकेचा ध्वज आहे.
वैज्ञानिकांच्या मते, व्हिडीओमध्ये दाखवलेले पेंग्विनचे वर्तन वास्तवापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. पेंग्विन नेहमी आपल्या समूहासोबतच राहतात. ते फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच आपला समूह सोडतात. पेंग्विन तरुण असल्यास किंवा अनुभवाची कमतरता असल्यास दिशाभूल होऊन कळपापासून वेगळे होतात. अनेकदा आजारपणामुळे किंवा जखम झाल्यामुळे पेंग्विन आपल्या समूहासोबत स्थलांतर करण्यास असमर्थ ठरतात. कधीकधी पेंग्विन नवीन ठिकाणाच्या शोधात कळपापासून दुरावतात.