Nigerian Dancer | सात दिवस न थांबता नायजेरियन डान्‍सरचे नृत्य 
विश्वसंचार

Nigerian Dancer | सात दिवस न थांबता नायजेरियन डान्‍सरचे नृत्य

पुढारी वृत्तसेवा

लागोस : नायजेरियातील ३२ वर्षीय नर्तक अर्थात डान्‍सर बेंजामिन डॅनियल गॅब्रिएलने सलग सात दिवस नृत्य करून सर्वाधिक काळ वैयक्तिक नृत्य मॅरेथॉन करण्याचा विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. ‘बेन डान्सर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गॅब्रिएलने तब्बल १७६ तास ५२ मिनिटे ५९ सेकंद नृत्य केले.

गॅब्रिएल हा संगीतकार मेड कुटी याच्यासोबत डान्‍सर म्हणून काम करतो. त्याच्या विक्रमाच्या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. नृत्यादरम्यान त्याने आफ्रोबीट्स, मकोसा आणि अन्य आफ्रिकी संगीताच्या तालावर विविध नृत्यप्रकार सादर केले. काही वेळाने उपस्थितांनीही त्याच्यासोबत ताल धरला.

या विक्रमासाठी गॅब्रिएलने २०२२ पासून तयारी सुरू केली होती. स्नायूंची ताकद, वेदना सहन करण्याची क्षमता आणि शारीरिक सहनशक्ती वाढविण्यासाठी त्याने व्यायाम व विशेष प्रशिक्षण घेतले. झोपेचा अभाव सहन करण्यासाठीही त्याने सराव केला. मात्र, विक्रमाच्या तीन आठवडे आधी त्याच्या गुडघ्यांना त्रास झाला होता. तरीही सात दिवसांच्या आव्हानादरम्यान त्याला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या जाणवली नाही, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. नृत्यादरम्यान गॅब्रिएल हलके अन्न आणि नारळपाणी घेत होता. नियमानुसार प्रत्येक सलग तासानंतर पाच मिनिटांची विश्रांती घेण्याची परवानगी होती. त्याने ही विश्रांती एकत्रित करून काही तास नृत्य केल्यानंतर ब्रेक घेण्याची पद्धत अवलंबली.

गॅब्रिएलने २०२२ पासून तीन वेळा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्‌कडे अर्ज केला होता. अखेर फेब्रुवारीमध्ये त्याला विक्रमासाठी मान्यता मिळाली. अधिकृत पडताळणी अद्याप बाकी असली, तरी या प्रयत्नामागील उद्देश केवळ विक्रम नोंदविणे नसून आफ्रिकन पारंपरिक नृत्यांना जगभरात ओळख मिळवून देणे हा असल्याचे त्याने सांगितले. नायजेरियात गिनिज विक्रमांच्या प्रयत्नांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. २०२३ मध्ये हिल्डा बासीने सर्वाधिक काळ स्वयंपाक करण्याचा विक्रम केल्यानंतर नायजेरियातून सुमारे १,५०० विक्रम अर्ज आल्याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT