Nanometer Chip Technology | १ नॅनोमीटरपेक्षा लहान ट्रान्झिस्टर असलेली संगणक चिप 
विश्वसंचार

Nanometer Chip Technology | १ नॅनोमीटरपेक्षा लहान ट्रान्झिस्टर असलेली संगणक चिप

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच १ नॅनोमीटरपेक्षा लहान आकाराचे ट्रान्झिस्टर असलेल्या संगणक चिप्स विकसित करण्यात यश मिळवले आहे. ही किमया ‘नॅनोस्टॅक’ नावाच्या एका नवीन आर्किटेक्चरमुळे शक्य झाली असून भविष्यात याद्वारे अगदी ०.१ नॅनोमीटर इतके सूक्ष्म ट्रान्झिस्टर बनवणेही शक्य होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

सध्या सुपरकॉम्प्युटर, एआय सिस्टीम्स आणि प्रगत ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटस्‌ (GPUs) मध्ये २ नॅनोमीटरचे ट्रान्झिस्टर वापरले जातात. नवीन तंत्रज्ञानाद्वारे बनवण्यात आलेले ०.७ नॅनोमीटरचे ट्रान्झिस्टर या पारंपरिक ट्रान्झिस्टरपेक्षा खूपच लहान आहेत. सेमीकंडक्टर चिप्सच्या जगात आकार जितका लहान, तितकी त्यांची कार्यक्षमता आणि क्षमता कैक पटीने जास्त असते. सामान्यतः, चिपचा आकार जितका लहान असेल, तितके जास्त ट्रान्झिस्टर एका चिपवर बसवता येतात. उदाहरणार्थ, सध्याच्या २ नॅनोमीटर चिपवर माणसाच्या नखाएवढ्या जागेत साधारणत: ५० अब्ज ट्रान्झिस्टर बसवता येतात.

मात्र, हे नवीन ट्रान्झिस्टर इतके सूक्ष्म आहेत की, त्यांचे मोजमाप नॅनोमीटरऐवजी ‘अँगस्ट्रॉम’मध्ये केले जात आहे, जे सहसा अणूंचा आकार मोजण्यासाठी वापरले जाते. या मालिकेतील पहिली चिप अवघ्या ७ अँगस्ट्रॉम (०.७ नॅनोमीटर) आकाराच्या ट्रान्झिस्टरसह तयार केली जाईल. हा आकार साधारणपणे ग्लुकोजच्या एका रेणूच्या रुंदीइतका आहे. या तंत्रज्ञानामुळे आता इंजिनिअर्स नखाएवढ्या छोट्या जागेत तब्बल १०० अब्ज ट्रान्झिस्टर बसवू शकणार आहेत, जे सध्याच्या २ नॅनोमीटर प्लॅटफॉर्मपेक्षा दुप्पट आहे.

शास्त्रज्ञांनी ही कामगिरी ‘नॅनोस्टॅकिंग’ नावाच्या नावीन्यपूर्ण पद्धतीचा वापर करून करून दाखवली आहे. जुलै २०२५ मध्ये ‘IEEE Xplore’ सर्व्हरवर अपलोड झालेल्या आणि ‘symposium on VLSI Technology and Circuits’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली होती. याद्वारे जुन्या पिढीच्या २ नॅनोमीटर चिप्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नॅनोशीटस्‌’ एकावर एक उभ्या रचणे इंजिनिअर्सना शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT