न्यूयॉर्क : कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि अचानक तुमच्यासमोर एक अशी महिला येते जिच्या टोपीवर कोंबडी आणि अंडी आहेत, किंवा एखादा माणूस स्वतः ‘चहाची किटली’ बनून फिरत आहे. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये दरवर्षी ईस्टरच्या निमित्ताने असाच काहीसा अतरंगी आणि जादुई नजारा पाहायला मिळतो. याला ‘ईस्टर बोनेट परेड’ म्हटले जाते, जिथे फॅशन आणि कल्पनाशक्तीला कोणतीही सीमा नसते.
न्यूयॉर्कची ही परेड जगातील सर्वात अनोख्या उपक्रमांपैकी एक आहे. कारण, ती पूर्णपणे अनौपचारिक आहे. या परेडमध्ये सामील होण्यासाठी कोणतेही तिकीट लागत नाही किंवा याचे कोणतेही अधिकृत सरकारी नियोजन नसते. दरवर्षी ‘फिफ्थ एव्हेन्यू’च्या रस्त्यांवर लोक स्वतःहून एकत्र येतात. रविवारच्या सकाळी 10 वाजल्यापासून 49 व्या स्ट्रीट ते 57 व्या स्ट्रीटपर्यंत पर्यटकांची आणि स्थानिक लोकांची प्रचंड गर्दी उसळते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ते कलाकार जे आपल्या टोप्या आणि पेहराव तयार करण्यासाठी महिनोनमहिने मेहनत करतात. ब—ुकलिनमधील कलाकार केसी सोबेल यांनी यावर्षी स्वतःला एका ‘चहाच्या किटली’चा लूक दिला होता.
त्यांच्या मते, ‘हा कार्यक्रम न्यूयॉर्कच्या लोकांना कडाक्याची थंडी विसरून वसंत ऋतूचे स्वागत करण्याची संधी देतो. येथे कोण किती पैसे खर्च करतो यापेक्षा कोण किती सर्जनशील आणि मजेदार दिसतो, याला जास्त महत्त्व असते.’ येथे कोणताही अधिकृत मुकाबला किंवा स्पर्धा नसते. लोक केवळ स्वतःला व्यक्त करण्यासाठी नवनवीन प्रयोग करतात. या परेडमध्ये केवळ माणसे नाही, तर त्यांचे पाळीव प्राणीही नटून-थटून येतात. काही कुत्र्यांनी (चिहुआहुआ) नारंगी आणि गुलाबी रंगाचे कपडे घालून सर्वांचे लक्ष वेधले, तर काही लोक चक्क पांढरे ससे घेऊन पोहोचले होते.
काहींनी फुग्यांपासून विशाल ससा आणि रंगीबेरंगी ड्रेस तयार केले होते. रस्त्यावर चालणारा प्रत्येक व्यक्ती जणू एक कलाकार होता आणि रस्ताच त्यांचे ‘स्टेज’ बनला होता. ब्लॉगर ‘ईगो’च्या मते, हा दिवस म्हणजे परंपरा, स्टाईल आणि न्यूयॉर्कच्या सर्जनशीलतेचे एक अनोखे मिश्रण आहे. सकारात्मक ऊर्जा, पेस्टल रंग आणि फुलांच्या सजावटीने मॅनहॅटनचा परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला होता. सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या बाहेर चर्चच्या घंटांच्या आवाजात हा रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.